दुचाकी चोरीप्रकरणी अट्टल गुन्हेगाराला अटक | पुढारी

दुचाकी चोरीप्रकरणी अट्टल गुन्हेगाराला अटक

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : शहरातील ललित सुभाष गुगळे यांच्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा श्रीगोंदा पोलिसांनी तपास लावत दुचाकी चोरीतील अट्टल गुन्हेगाराला अटक करीत त्याच्याकडून 2 लाख 37 हजार रुपये किमतीच्या 7 मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत.
रवींद्र विठ्ठल पवार (साळवण देवी रस्ता, श्रीगोंदा), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील ललित सुभाष गुगळे यांची एचएफ डिलक्स मोटारसायकल 19 डिसेंबर रोजी घरासमोरून चोरीस गेली.

याची फिर्याद 21 डिसेंबर रोजी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी अधिक तपास करीत असताना या गुन्ह्यातील संशयित आरोपी रवींद्र विठ्ठल पवार हा 13 जानेवारी रोजी श्रीगोंदा बसस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बसस्थानकावर सापळा रचला. दुपारी 4 वाजता संशयित आरोपी तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

दुचाकी चोरीबाबत कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यातील एचएफ डिलक्स एमएच 16 ऐके 2666 क्रमांकाची दुचाकी, तसेच इतर गुन्हातील चोरलेल्या सहा दुचाक्या एकूण 2 लाख 37 हजार रुपये किमतीच्या सात दुचाक्या हस्तगत केल्या. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दुचाक्या चोरीचे 3 गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून आणखी दुचाक्या चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्हाचा तपास पोलिस नाईक. बी. एल. खारतोडे करीत आहेत.

Back to top button