पुणे: दीड वर्षापासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला बेड्या | पुढारी

पुणे: दीड वर्षापासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला बेड्या

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कट रचून खुनाचा प्रयत्न केल्याच्या मोक्काच्या गुन्ह्यात दीड वर्षापासून फरार असलेल्या एकाला पत्नीला चांदणी चौकात भेटण्यासाठी आल्यानंतर सापळा रचून बसलेल्या पथकाने पाठलाग करून पकडले.

नकुल शाम खाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी व कट रचण्यासह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. 2021 मध्ये गुन्हा केल्यापासून सुमारे दीड वर्षे फरार असलेला नकुलच्या नातेवाईक तसेच मित्रांवर वारजे पोलिस गेल्या तीन महिन्यांपासून पाळत ठेऊन होते. तसेच तो अधून मधून पत्नीला भेटून गेल्याची देखील माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान तो त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी चांदणी चौकात थांबणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकातील पोलिस नाईक प्रदिप शेलार आणि पोलिस शिपाई बंटी मोरे या दोघांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, गुन्हे निरीक्षक दत्ताराम बागवे, उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, पार्वे, पोलिस अमंलदार रामदास गोणते, अमोल राऊ, गोविंद फड, अनंत मासाळ यांच्या पथकाने केली.

Back to top button