नंदुरबार : कापसाने भरलेली धावती ट्रक अडवून काही तरुणांनी चाकूचा धाक दाखवत ट्रकचालकाकडील रोख रक्कम आणि 12 क्विंटल कापूस लुटून नेल्याची घटना घडली. रात्रीच्या वेळी रस्ता लूट करण्याचा हा प्रकार घडल्याने वाहनधारकांमध्ये धडकी भरली आहे. याप्रकरणी दरोडाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २ फेब्रुवारी रोजी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास कुकरमुंडा फाटाजवळ घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार १ फेब्रुवारी रोजी कन्नड तालुक्यातील चापनेर येथून कापूस भरून ट्रक (एमएच २० ईजी ०७५३) ही निघाली होती. गाडीवर चालक म्हणून लखन अंबादास ढगे (वय ३२, रा. जांबाडा टाकळी ता. गंगापूर जि. औरंगाबाद) व क्लिनर मेहमूद दाऊत शेख (रा. पिंपरखेड ता. चाळीसगाव) होते. गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास नंदुरबार येथून कुकरमुंडा फाटा येथे हा ट्रक आला असता फाट्यावर दोन जण कॅन घेऊन उभे होते, त्यांनी आवाज देत ट्रक थांबवला.
त्यांच्याकडील डिझेल संपले आहे, असे सांगितले. मात्र चालकाने रात्र असल्याने गाडी न थांबता पुढे जायला निघाला. तिथून अक्कलकुवा रस्त्याकडे चार पाच किलोमीटर अंतरावर ट्रक जात नाही तोवरच एक ट्रक वेगाने येऊन त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. त्यातून वीस-पंचवीस वर्ष वयाचे तरुण उतरले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून या ट्रकचालकाला धमकावले. चालक ढगेला चाकू दाखवून बारा हजार रुपये रोख काढून घेतले त्यानंतर चारही जणांनी चालकाच्या गाडीतून साधारण १२ क्विंटल कापूस व गाडीच्या डिझेल टाकीतून साधारण ६० लिटर डिझेल काढून घेऊन त्यांच्या ट्रकमध्ये बसून पळून गेले. सकाळी सात वाजेच्या सुमारास चालकाने १९२ वर कॉल करून पोलिसांना खबर दिली. त्यानंतर त्या ठिकाणी पोलिस दाखल झाले. याप्रकरणी चालक लखन आंबादास ढगे (वय ३२, रा. जांबाडा रा. टाकळी ता. गंगापूर जि. औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करत आहे.
हेही वाचा :