कंधार तालुक्यातील गोगदरी येथील एका कट्टर शिवसैनिक असलेल्या शेतकऱ्याने नापिकी व बँकेचे घेतलेले कर्ज माफ होऊन सुद्धा नवीन कर्ज मिळण्यासाठी बॅंकेत चकरा मारल्या. पण बॅंक कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिल्याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला शिवसेनेच्या भगव्या दस्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Nanded farmer suicide)
या प्रकरणी मयत उत्तम आयनाथ कल्याणकर यांचा पुतण्या रघुनाथ विठ्ठल कल्याणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, गोगदरी येथील रघुनाथ विठ्ठल कल्याणकर यांनी कंधार पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझा चुलता उत्तम आयनाथ कल्याणकर (५५ वर्षे) गोगदरी गावात स्वतःची शेती आहे. अल्पभूधारक असलेले उत्तम कल्याणकर यांनी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता शेतातील धुऱ्यावर लिंबाच्या झाडास अंगावर असलेल्या शिवसेनेच्या भगव्याच्या दस्तीने गळफास घेतला. अशी माहिती पोलिस स्थानकात देण्यात आली.
त्यांची पत्नी सुशिलाबाई कल्याणकर यांना शासनाकडून कर्ज माफ झाले. त्यानंतर नापिकीमुळे नवीन कर्ज घेण्यासाठी कंधार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सुमारे तीन महिन्यापासून कल्याणकर चकरा मारीत होते. या दरम्यान बँकेचे व्यवस्थापक, फिल्ड ऑफिसर व इतर कर्मचाऱ्यांनी अपमानाची वागणूक दिल्याचे त्यांची पत्नी यांनी माहिती दिली.
माझ्या पतीने सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद मयताची पत्नी सुशिलाबाई उत्तम कल्याणकर यांनी कंधार पोलीस स्थानकात दिली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, तीन मुली, भावजय असा मोठा परिवार आहे.
याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात त्यांची पत्नी सुशिलाबाई कल्याणकर यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. केंद्रे, स.पो.उपनिरीक्षक आर.यू.गणाचार्य करत आहेत.