

महापालिकेतील तब्बल साडेचार हजारांवर कर्मचार्यांचा पगार झालेला नाही. एरव्ही वर्षभर प्रत्येक महिन्याच्या 15 ते 20 तारखेपर्यंत पगार होतो. परंतु, दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी तरी लवकर पगार होईल, अशी कर्मचार्यांना आशा होती. तीन हजारांवर सेवानिवृत्तांनाही पेन्शन दिलेली नाही. पगार नसल्याने ऋण काढून सण साजरा करण्याची वेळ कर्मचार्यांवर आली आहे. (kolhapur mahapalika)
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचार्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी पगार मिळालेला नाही. प्रशासनाच्या नियोजनशून आणि भोंगळ कारभारामुळे ऐन दिवाळीत कर्मचार्यांना उधारऊसनवारी करावी लागत आहे. महापालिका कर्मचारी संघाने पगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न न केल्याने तीव— संताप व्यक्त केला जात आहे.
दरवर्षी महापालिका प्रशासन दिवाळीपूर्वी पगार व दिवाळी अॅडव्हान्स रक्कम देते. परंतु, यंदा त्यात खंड पडला. वास्तविक 4 नोव्हेंबरला दिवाळी आहे, हे 1 जानेवारीला समजले होते. परंतु, प्रशासनाने कर्मचार्यांना वेळेत पगार मिळेल याचे नियोजन केले नाही. महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत कमी असल्याने आर्थिकदृष्ट्या मर्यादा येत आहेत. परिणामी, पगारही लांबत आहेत. परंतु, दिवाळीसाठी तरी पगार वेळेत होणे आवश्यक होते.
महापालिकेचे सुमारे तीन हजारावर अधिकारी-कर्मचारी पेन्शनर आहेत. साधारणतः महिन्याच्या एक तारखेला पेन्शन होणे अपेक्षित असते. परंतू पेन्शनही वेळेवर होत नाही. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह फक्त पेन्शनवर चालतो. अनेकांचा औषधपाण्याचा खर्च असतो.
दिवाळीला तरी वेळेवर पेन्शन मिळेल, अशी आशा पेन्शनरांना होती. परंतु, अद्याप पेन्शन झालेली नाही. प्रशासनाच्या वतीने 8 ते 10 नोव्हेंबरला पेन्शन होईल, असे सागंण्यात आले. पेन्शनवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना दिवाळीसाठी उधार ऊसनवारी किंवा कर्ज काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
प्रशासन व महापालिका कर्मचारी संघाच्या पदाधिकार्यांत बैठक झाली. त्यात चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना आठ हजारांऐवजी साडेबारा हजार व तृतीय श्रेणी आणि रोजंदारांना प्रत्येकी चार हजार रु. दिवाळी अॅडव्हान्स मंजूर झाला. परंतु, कर्मचारी संघाच्या पदाधिकार्यांनी पगारासाठी आग्रह धरला नाही. तसेच मंजूर अॅडव्हान्सही वेळेत मिळाला नाही.
दै.'पुढारी'तून याविषयी मनपा कर्मचार्यांची दिवाळी बिनपगारी आणि पगार नसल्याने कर्मचार्यांचा दिवाळीत शिमगा या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानंतर महापालिका प्रशासन हडबडून जागे झाले. शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशीही अधिकारी कामाला लागले. अखेर सोमवारी दुपारी कर्मचार्यांच्या हातात अॅडव्हान्सची रक्कम पडली. केवळ 'पुढारी'मुळेच लवकर रक्कम मिळाली, अशा भावना कर्मचारी वर्गातून व्यक्त केल्या जात होत्या. कर्मचार्यांची बाजू ठामपणे मांडल्याबद्दल दै. 'पुढारी'चे आभार मानले जात होते.