नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यावर विकास कुणाचा होतोय? स्वतःला वाचविण्यासाठी ते सत्तेत गेले, कांदा केंद्र सरकार खरेदी करेल, असे सांगणाऱ्या माझ्या जपानवरून बोललेल्या मित्राला असा सवाल आहे की मग ४० टक्के शुल्क का माफ केले नाही? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
लवकरच सुरू होणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या पदयात्रेच्या आढाव्याची बैठक आज मंगळवारी काँग्रेस नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रविभवन येथे पार पडली. यानिमित्ताने ते (Nana Patole) माध्यमांशी बोलत होते.
कांदा प्रश्नी पटोले म्हणाले, नाफेडने यापूर्वी काहीच घेतले नाही, शेतकऱ्यांना भाजपला उत्तर द्यावे लागेल. जो कांदा खराब होईल, त्याचे पैसे मिळणार का? गेल्या ४ महिन्यापासून धानाचे पैसे मिळालेले नाहीत. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
राज्यात ईडीचे आणि आता येड्याचे सरकार आहे. २ उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर नजर लावून आहेत. दादा भुसे काय बोलतात, हे विद्वानांचे सरकार असून या सगळ्या मंत्र्यांच्या बद्दल बोलायला काहीच राहिले नाही. तलाठी परीक्षेत विद्यार्थांचे नुकसान झाले, त्याची जबादारी कोण घेणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोल्डवॉर सुरू आहे. याकडे लक्ष वेधले असता, यांच्यात खूप काही होणार आहे. मात्र, त्यांच्या गंमती जमतीमध्ये आम्हाला पडायचे नाही, असेही पटोले म्हणाले. दरम्यान, १२ विधान परिषद आमदार संदर्भात बोलताना भगतसिंग कोश्यारी यांची बाजू मुख्यमंत्र्यांनी घेणे चुकीचे ठरेल, संविधानिक व्यवस्थेचा खून करण्याचे पाप त्यांनी केल्याचा आरोप पटोले यांनी यावेळी केला.
हेही वाचा