पुढारी ऑनलाईन डेस्क : Mysuru Dasara fame Elephant Balaram : म्हैसूरमधील दसरा उत्सव कर्नाटक राज्यातील सांस्कृतिक ठेवा मानला जातो. हा उत्सव जगभरातील पर्यटकांच्या आर्कषणाचे केंद्र आहे. याच उत्सवात गेली १४ वर्ष मानाची सोन्याची अंबारी घेवून मिरवणुकीत सहभागी होणारा हत्ती बलराम याचे प्रदीर्घ आजाराने रविवारी सायंकाळी निधन झाले. तो ६७ वर्षांचा होता. बलरामच्या एक्झिटमुळे भाविकांवर शोककळा पसरली आहे.
कर्नाटकमधील नागरहोल व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलराम हा क्षयरोगाने त्रस्त होता. १९ एप्रिलपासून भीमनकट्टे हत्तींच्या छावणीत त्याच्यावर उपचार सुरु होते. तेव्हापासून त्याने आहार बंद केला होता. आम्ही त्याच्यावर उपचार केले. तो त्याला प्रतिसादही देत होता. सुमारे चार हजार किलो वजन असलेल्या बलरामाचे वजन सुमारे 3,200 किलोपर्यंत घसरले होते. मात्र त्याची प्रकृती पुन्हा खालावली. अखेर रविवारी सायंकाळी त्याचे निधन झाले. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
१९८७ मध्ये वन कर्मचार्यांनी बलरामला कर्नाटकातील कोडागु भागातील सोमवारपेटजवळील कट्टेपुरा जंगलात पकडले होते. वैद्यकीय नोंदीनुसार, तेव्हा तो ३० वर्षांचा होता. १९५८ मध्ये जन्मलेल्या या हत्तीने म्हैसूरच्या दसरा उत्सवात १४ वर्षे सोन्याच्या अंबारीत वाहून नेली होती. सोन्याची अंबारी वाहून नेण्यासाठी त्याने कठोर सराव करावा लागला होता. या उत्सवात सलग १४ वर्ष सोन्याची अंबारी वाहून नेण्याचा मान मिळणारा बलराम हा एकमेव हत्ती ठरला होता. (Mysuru Dasara fame Elephant Balaram)
भव्य आणि शांत , असे वन विभागाचे कर्मचारी बलरामचे वर्णन करत असत. अन्य हत्तींना प्रशिक्षण देण्यासाठी आणि इतर छावणीतील हत्तींना शांत ठेवण्यासाठी देखील त्याचा वापर केला जात होता, असे वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
म्हैसूर दसरा सणाच्या दहाव्या दिवशी ७५० किलोच्या सोन्याच्या अंबारीमध्ये देवीची पवित्र मूर्ती पाठीवर मिरवणुकीत सहभागी होणारा बलराम आकर्षणाचे केंद्र होता. इतर खेळकर हत्तींपेक्षा सौम्य स्वभावाचा शांत हत्ती अशीही त्याची ओळख होती. सोशल मीडियावरही त्याची बरीच माहिती उपलब्ध होते. बलराम : अ रॉयल एलिफंट हे टेड अँड बेट्सी लेविन लिखित पुस्तकही प्रसिद्ध आहे. (Mysuru Dasara fame Elephant Balaram)