पुढारी ऑनलाईन : जर तुम्ही मुंबईचे रहिवासी असाल अथवा या ठिकाणी थोडा वेळ जरी घालवला असला तर येथील वडा पाव तुम्हाला देखील परिचित असेल. तुम्ही नाश्ता, दुपारचे जेवण किंवा दिवसाच्या कोणत्याही क्षणी वडा पावचा आनंद घेऊ शकता. मुंबईत प्रसिद्ध असलेल्या वडा पावला गरिबांचा बर्गर असेही म्हटले आहे. मुंबईच्या वडा पावने प्रसिद्ध स्ट्रीट फूडच्या जागतिक पदार्थांच्या यादीत आपला ठसा उमटवला आहे. जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत मुंबईच्या वडा पावने १३ वे स्थान मिळवले आहे. (Mumbai Vada Pav)
जगभरातील सर्वोत्कृष्ट ५० सँडविचची माहिती टेस्ट ॲटलासद्वारे संकलित करण्यात आली आहे. टेस्ट ॲटलास पारंपारिक पाककृतींसाठी प्रवास मार्गदर्शक म्हणून काम करते. पाककृती मार्गदर्शकांकडून जगभरातील लोकप्रिय पदार्थ आणि जेवणाबद्दल शोध घेण्यात येतो आणि त्यावर शोधनिबंध तयार केले जातात.
टेस्ट ॲटलासने जगभरातील सर्वोत्कृष्ट ५० सँडविचची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत तुर्कीच्या टॉम्बिक या पदार्थाचा पहिला, त्यानंतर पेरू देशातील बुटीफारा याचा दुसरा तर अर्जेंटिनाच्या सँडविच डी लोमो या सँडविचचा तिसरा क्रमांक लागतो. (Mumbai Vada Pav)