लंडनमध्ये वडापाव विकून मालामाल झाले दोन मित्र! | पुढारी

लंडनमध्ये वडापाव विकून मालामाल झाले दोन मित्र!

लंडन : महाराष्ट्रात वडा-पाव आवडणार नाही असा माणूस विरळच! कमी पैशात छोटी भूक भागवणार्‍या आणि जिभेला तृप्तही करणार्‍या या पदार्थाने सचिन तेंडुलकरपासून सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वांनाच आपलेसे केले आहे. आता हा वडापाव इंग्लंडची राजधानी लंडनमध्येही आपला डंका वाजवत आहे. सुजय सोहनी आणि सुबोध जोशी या दोन मित्रांनी आपली नोकरी गमावल्यावर चक्क वडापावचा व्यवसाय सुरू केला आणि ते मालामालही झाले.

हे दोघेजण कॉलेजच्या दिवसांपासून मित्र आहेत. दोघांनी मुंबईतच महाविद्यालयीन शिक्षण घेतले असल्याने वडापावची चव त्यांनी चाखली होतीच. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघेही लंडनला गेले व तिथे नोकरी करू लागले. आधी ते लंडनच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये नोकरी करीत होते. 2010 पर्यंत त्यांच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, नंतर मंदीमुळे त्यांची नोकरी गेली. त्यानंतर निर्माण झालेल्या खडतर परिस्थितीला त्यांनी धैर्याने तोंड दिले.

दोघांनी वडापाव विकण्याचे ठरवले आणि त्याचा लंडनमध्ये बिझनेस सुरू केला. आता त्यांचा ब्रँड विकसित झाला असून दोघे लाखो रुपयांची कमाईही करीत आहेत. त्यांनी आधी एका प्रसिद्ध आईस्क्रिम पार्लरमध्ये थोडीशी जागा भाड्याने घेऊन तिथे वडापावचा स्टॉल लावला होता. सुरुवातीला त्यांना कमी प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी लंडनच्या रस्त्यांवर जाऊन लोकांना मोफत वडापाव देण्यास सुरुवात केली. हळूहळू लोकांना तो आवडू लागला आणि ते नियमित ग्राहक बनले. त्यामुळे या दोघांच्या वडापावची विक्रीही वाढू लागली.

Back to top button