मुंबई : पुढारी वृत्तसेवा
अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या कमलकांत कपूरचंद शहा या ४७ वर्षांच्या पतीच्या हत्येच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेली आरोपी पत्नी कविता ऊर्फ काजल कमलकांत शहा आणि तिचा प्रियकर हितेश शांतीलाल जैन या दोघांनी सासूचीही खाण्या-पिण्यातून अर्सेनिक आणि थेलियम धातूचा वापर करुन हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या दोघांवर आता दुहेरी हत्येचा गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. कमलकांत शहा हे व्यवसायाने कापड व्यापारी असून ते सांताक्रुज येथील दत्तात्रय रोड, इंडियन बँकेसमोरील गणेशकृपा इमारतीमध्ये राहत होते. कविता ही त्यांची पत्नी असून तिचे हितेशसोबत अनैतिक संबंध होते. या दोघांच्या संबंधाला कमलकांत हे अडसर होते. त्यामुळे या दोघांनी कमलकांत यांच्या हत्येची योजना (Mumbai Murder) बनविली होती.
खाण्या-पिण्यातून ते दोघेही त्यांना विषारी धातू देत होते. त्यातून त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले होते. ३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत त्यांच्यावर तिथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. उपचारादरम्यान त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त होताच डॉक्टरांना धक्काच बसला होता. एखाद्या व्यक्तीच्या शरी- रातील आर्सेनिकचे सामान्य प्रमाण ४.१ ते ११.९ असते, मात्र कमलकांतच्या रक्तात आर्सेनिकचे प्रमाण ४२५.७६ होते. थेलियमचे प्रमाण ०.१५ ते ०.६३ असते, मात्र त्यांच्या शरीरात थेलियमचे प्रमाण ३६२.३४ इतके होते. त्यांच्यात रक्तात आर्सेनिक आणि थेलियमचे प्रमाण प्रचंड होते. त्यामुळे ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूबाबत डॉक्टरांनी शंका उपस्थित करुन आझाद मैदान पोलिसांना ही माहिती दिली होती. डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात कमलकांत यांना विषारी पदार्थ देण्यात आल्याचे नमूद केले होते. त्यामुळे आझाद मैदान पोलिसांनी एडीआरची नोंद करुन त्याचा तपासात सांताक्रुज पोलिसांकडे वर्ग केला होता.
या घटनेनंतर कमलकांत यांची बहिण कविता अरुणकुमार ललवानी हिने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सांताक्रुज पोलिसांकडून हा तपास गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटकडे वर्ग करण्यात आला होता. हा तपास हाती येताच कविता ऊर्फ काजल शहा आणि तिचा प्रियकर हितेश जैन या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनीच कमलकांतला खाण्या-पिण्यातून आर्सेनिक आणि थेलियम नावाचे विषारी धातू दिल्याची कबुली दिली. या दोघांच्या अनैतिक संबंधाला कमलकांत हे अडसर होते, त्यातून त्यांनी त्यांची हत्येची योजना बनवून ती योजना अंमलात आणली होती. त्यांच्या हत्येनंतर त्यांची संपत्ती हडप करण्याची त्यांची योजना होती. मात्र रक्ताच्या अहवालात ही बाब निदर्शनास आल्याने हा कट उघडकीस आला.
सासूचीही पतीप्रमाणे हत्या केल्याचे तपासात उघड कमलकांतची आई आणि कविताची सासू सरला कपूरचंद शहा हिचा मृत्यू १३ ऑगस्ट २०२२ रोजी झाला होता. त्यांच्या शरीरात अशाच प्रकारे अर्सेनिक आणि थेलियमचे प्रमाण जास्त होते. कमलकांत यांच्याप्रमाणे सरला शहा यांनाही कविता आणि हितेश यांनी विषारी पदार्थ दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तशी कबुलीच या दोघांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत दिली आहे. सासू सरला हिला खाण्या- पिण्यातून अशाच प्रकारे अर्सेनिक आणि थेलियम देण्यात आले. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला होता.
हत्येची संपूर्ण योजना कविताची होती आणि हितेशने त्याची अंमलबजावणी केली होती. त्यासाठी त्यांनी आधीपासून तयारी केली होती. या धातूचा प्रभाव दिसण्यासाठी किमान ४० ते ५० दिवस लागतात. अर्सेनिक आणि थेलियम धातू बाजारात सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे कविताने हितेशला ऑनलाईन पोर्टवरुन ते धातू विकत घेण्यास प्रवृत्त केले होते.
हेही वाचा