भुयारी मार्गातून धावली पुणे मेट्रो ! रेंजहिल ते न्यायालय इंटरचेंज स्थानकापर्यंत घेतली चाचणी | पुढारी

भुयारी मार्गातून धावली पुणे मेट्रो ! रेंजहिल ते न्यायालय इंटरचेंज स्थानकापर्यंत घेतली चाचणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेंजहिल डेपोपासून न्यायालयापर्यंतच्या स्थानकापर्यंत भुयारी मार्गातून मेट्रोची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. रेंजहिल उन्नत स्थानकापासून न्यायालय स्थानकाचे अंतर तीन किलोमीटर आहे. मेट्रोचे काम सुमारे 85 टक्के पूर्ण झाले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट दरम्यानचा मेट्रो मार्ग 17.4 किलोमीटर आहे. त्यामध्ये भुयारी मार्ग सहा किलोमीटर असून, त्यामध्ये पाच भुयारी स्थानके आहेत. भुयारी मार्गाचे काम टनेल बोअरिंग मशीनच्या साहाय्याने 4 जूनला पूर्ण झाले. त्यानंतर मेट्रोच्या भुयारामध्ये ट्रक, ओव्हरहेड विद्युत तारा आणि सिग्नलिंगची कामे करण्यात आली.

रेंजहिल कार डेपो ते रेंजहिल उन्नत मेट्रो स्थानक आणि त्यानंतर रेंजहिल उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानक, त्यानंतर न्यायालय इंटरचेंज मेट्रो स्थानक अशी 3 कि.मी.ची मेट्रो चाचणी आज घेण्यात आली. पुणे मेट्रोच्या महत्त्वाच्या टप्प्यांपैकी हा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. भुयारी स्थानकांसाठी कट अँड कव्हर तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे खोदून खालून बांधकाम करत वर यावे लागते. शिवाजीनगर, न्यायालय, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट ही अत्यंत गजबजलेली ठिकाणे असून, या भागांतून सामानाची ने- आण करणे जिकिरीचे आहे. या सामानासाठी वाहतुकीची वाहने रात्री 12 ते सकाळी 5 या वेळातच ने-आण करीत होती.

मेट्रोची आजची चाचणी दुपारी तीन वाजता रेंजहिल कारडेपो येथून सुरू झाली. रेंजहिल कारडेपो ते रेंजहिल उन्नत मेट्रो स्थानक अशा रॅम्पवर वाटचाल करत ट्रेन स्थानकापर्यंत पोहोचली. तेथे ड्रायव्हरने आपला कक्ष बदलला व मेट्रो ट्रेन रेंजहिल उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानक ते न्यायालय इंटरचेंज स्थानकातील भूमिगत स्थानकापर्यंत पोहोचली. या चाचणीसाठी गेल्या आठवड्यापासून मेट्रोचे ट्रॅक, विद्युत, सिग्नलिंग, देखरेख व संचालन असे सर्व विभाग सतत कार्यरत होते.

आजची भूमिगत मेट्रो चाचणी ही तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि किचकट अशी होती. या चाचणीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार्‍या पुणे मेट्रोचे कर्मचारी यांचे मी अभिनंदन करतो. पुणे मेट्रोचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून एक एक टप्पा पार पाडत ती पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. येत्या काही महिन्यांत फुगेवाडी ते न्यायालय आणि गरवारे ते न्यायालय या मार्गांची कामे पूर्ण करून तो प्रवाशांंसाठी खुला करण्यात येईल.
                                         – डॉ. ब्रिजेश दीक्षित,  व्यवस्थापकीय संचालक, महाम

Back to top button