Latest

Prithvi Shaw: पृथ्वी शॉचे त्रिशतक, ‘रणजी’त दुसरी सर्वोच्च धावसंख्या नोंदवून रचला इतिहास

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) रणजी ट्रॉफी कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले. त्याने 383 चेंडूत 379 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च वैयक्तीक धावसंख्या आहे. त्याच्या आधी बीबी निंबाळकर यांनी 1948-49 च्या मोसमात महाराष्ट्राकडून खेळताना काठियावाड संघाविरुद्ध नाबाद 443 धावा फटकावल्या होत्या.

रणजी ट्रॉफीमध्ये एका डावात 350 धावा करणारा शॉ नववा खेळाडू ठरला. त्याने स्वप्नील गुगळे (351*), चेतेश्वर पुजारा (352), व्हीव्हीएस लक्ष्मण (353), समित गोहेल (359*) आणि संजय मांजरेकर (377) यांना मागे टाकले. तो 400 धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होते, पण उपाहारापूर्वीच्या शेवटच्या षटकात रियान परागने पृथ्वीला 379 वर पायचीत केले. त्याची ही धावसंख्या रणजी ट्रॉफीतील सलामीवीराची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. पृथ्वीने (Prithvi Shaw) त्रिपुराच्या समित गोहेलचा विक्रम मोडीत काढला. गोहेलने 2016 मध्ये सलामीला येत 359 धावा फटकावल्या होत्या.

शॉने तीन भागीदारी केल्या आणि तिन्हींमध्ये त्याचे योगदान सर्वाधिक होते. त्याने मुशीर खानसोबत पहिल्या विकेटसाठी 123 धावांच्या भागीदारी केली. यात 75 धावांचा वाटा पृथ्वीचा (Prithvi Shaw) होता. त्यानंतर अरमान जाफरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 74 धावा जोडल्या. यात शॉच्या बॅटमधून 42 धावा आल्या. तर कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 401 धावांची भागीदारी करताना पृथ्वीने 262 धावांचे योगदान दिले.

या खेळीने शॉचा खराब फॉर्म संपुष्टात आणला. त्याने मागील सात रणजी ट्रॉफी डावांमध्ये केवळ एकच अर्धशतक फटकावले होते. आतापर्यंत पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या शॉने जुलै 2021 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. 23 वर्षीय पृथ्वी शॉने 41 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3,300 धावा केल्या आहेत. यात 12 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.

तत्पूर्वी पृथ्वीने पहिल्या दिवसाच्या 240 धावसंख्येवरून आपला डाव पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि सामन्याच्या दुस-या दिवशी त्याने 99 चेंडूंत 139 धावा वसूल केल्या. यादरम्यान पृथ्वीने अवघ्या 326 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले. यासह तो रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी त्रिशतक झळकावणारा 8 वा फलंदाज ठरला. आपल्या धडकेबाज त्रिशतकी खेळीत पृथ्वीने 4 षटकार आणि 49 चौकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेटही 98.96 होता. अखेरीस मुंबईने आपला डाव चार बाद 687 धावांवर घोषित केला. कर्णधार अजिंक्य रहाणेने शतक झळकावले. तो 191 धावा करून बाद झाला.

रणजी ट्रॉफीतील सर्वोच्च वैयक्तीक धावसंख्या

1. बीबी निंबाळकर (महाराष्ट्र) : 443* धावा : विरुद्ध काठियावाड (1948)
2. पृथ्वी शॉ (मुंबई) : 379 धावा : विरुद्ध आसाम (2023)
3. संजय मांजरेकर (तत्कालीन बॉम्बे) : 377 धावा : विरुद्ध हैदराबाद (1991)
4. एमव्ही श्रीधर (हैदराबाद) : 366 धावा : विरुद्ध आंध्र (1994)
5. विजय मर्चंट (बॉम्बे) : 359* धावा : विरुद्ध महाराष्ट्र (1943)
6. समित गोहेल (गुजरात) : 359* धावा : विरुद्ध ओडिशा (2016)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT