पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई महाराष्ट्राचीच आहे, कुणाच्याही बापाची नाही आणि त्याच्यावर कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकला ठणकावलं. कर्नाटकच्या बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे. अशी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांना केली जाईल असे सांगत मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, या कर्नाटकच्या मंत्र्याच्या वक्तव्याचा निषेधही फडणवीस यांनी विधिमंडळात केला.
कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी. नारायण यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निषेध करत सीमाप्रश्नाला चुकीचे वळण देण्याचे आणि सीमावासीयांच्या भावनेला ठेच पोहचवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होत आहे. कर्नाटक सरकारची ही माहीती केंद्र सरकार पर्यंत पोहचवावी, अशी मागणी केली.
यावर प्रत्यूत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती तेव्हा दोन्ही राज्यांनी मान्य केले होते की, नव्याने दावे केले जाणार नाहीत. महाराष्ट्राने ठराव करताना सर्वोच्च न्यायालयात जो दावा आहे, त्यानुसारच ठराव केला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी जे दावे केले आहेत ते बैठकीशी विसंगत आहेत. मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. निषेधाच पत्र त्यांना पाठवले जाईल. गृहमंत्र्यांसमोर जे ठरले त्याचे उल्लंघन करणे दोन्ही राज्यांसाठी योग्य नाही, हे कडक शब्दांत कर्नाटकला सांगण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांनाही याबाबत सांगण्यात येईल, आपल्या समोर जे ठरले होते त्याच पालन महाराष्ट्र करत आहे, पण कर्नाटक करत नाही. कर्नाटकच्या बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहीजे. अशी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांना केली जाईल. मुंबई महाराष्ट्राचीच आहे, कुणाच्याही बापाची नाही. मुंबईवर कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
हेही वाचा :