मुंबई : पुढारी वृत्तसेवा; मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची मुंबई महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. मुंबईत 6 हजारांहून जास्त ठिकाणी सुरू असलेल्या इमारत बांधकामांच्या परिसरात धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी झालीच पाहिजे अन्यथा खाजगी असो किंवा शासकीय या बांधकामांना रोखण्यात येईल, असा सक्त इशारा महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे. (Mumbai Air Pollution)
वातावरणातील बदलांमुळे मुंबई शहरासह मुंबई प्रदेशातील हवेची गुणवत्ता खालावत आहे. हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत पालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी आदी यंत्रणा तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या विकासकांच्या विविध संघटनांची संयुक्त बैठक शुक्रवारी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आयुक्तांनी हवेतील गुणवत्तेवर होणाऱ्या विपरीत परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली.
मुंबईत हवेची गुणवत्ता खालावत असल्याची दखल केंद्र व राज्य शासनाने देखील घेतली असून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले. हवेतील प्रदूषण वाढण्यामागे धूळ हा एक मोठा घटक असून तो शहरात सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामांमुळे वाढलेला दिसून येत आहे. बांधकाम व्यवसाय अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक असला तरी त्यामध्ये धूळ प्रतिबंधक उपाययोजना करणे, प्रदूषणास कारणीभूत अन्य घटकांना नियमांनुसार कार्यवाही करायला लावणे, यासाठी मुंबईतील सर्व शासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय राखून तातडीने व सक्तीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई प्रदेशातील अन्य महापालिका व संबंधित संस्थांची तातडीने बैठक घेवून उपाययोजनांना गती द्यावी, असे आवाहनही चहल यांनी यावेळी केले.
धूळ व प्रदूषण नियंत्रणाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे सोमवार, 23 ऑक्टोबरपर्यंत प्रसारित करण्यात येतील. त्यांचे पालन सर्व घटकांनी व यंत्रणांनी करणे आवश्यक आहे. अन्यथा कोणतीही कसर न ठेवता त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ताकीदही चहल यांनी यावेळी दिली.
महापालिकेच्या 24 प्रशासकीय विभागातील बांधकामांची पाहणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागात किमान 50 पथकांची नियुक्ती करून बांधकामांच्या ठिकाणी अचानक भेटी देवून थेट व्हिडिओ चित्रीकरण करावे. त्यात त्रुटी आढळून आल्यास थेट जागेवरच नोटिस देवून अशी बांधकामे लगेच रोखावीत, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
हेही वाचा