पुढारी ऑनलाईन डेस्क : त्रिपुरातील जिल्हा न्यायालयात एका विधवेच्या हत्येप्रकरणी खटला सुरू असताना एका आईने न्यायासाठी आपल्याच मुलाविरुद्ध हृदयावर दगड ठेवून साक्ष दिली. आईच्या महत्त्वपूर्ण साक्षीमुळे तिचा मुलगा आणि त्याच्या मित्राला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका विधवा महिलेच्या हत्येप्रकरणी त्रिपुराच्या सिपाही जिल्हा न्यायालयाने शनिवारी (दि.२) सुमन दास (वय २४) आणि चंदन दास (वय २६) या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
बिशालगड नगरपरिषदेत कृष्णा दास (वय ५५) या विधवा महिला सफाई कामगार म्हणून काम करत होत्या. एप्रिल २०२० मध्ये सिपाहीजाला येथे एकट्या राहणाऱ्या कृष्णा दास यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन दास आणि चंदन दास या तरुणांनी महिलेवर तिच्याच घरात बलात्कार केला. त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. नंतर, आरोपींनी मृतदेह एका निर्जन विहिरीत फेकून दिला. मृतदेह सापडल्यानंतर मृत महिलेची सून सुमित्रा दासने एफआयआर दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
याप्रकरणी पोलिसांनी सुमन दास आणि चंदन दास यांना अटक केली. त्यांच्या कबुलीजबाबाच्या आधारे आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुमनच्या आईसह २५ लोकांचे जबाब नोंदवले. आईने तिच्या मुलाविरुद्ध साक्ष दिली. जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकील गौतम गिरी यांनी सांगितले की, सुमनची आई नमिता दास यांनी महिनाभरापूर्वी तिच्या दोषी मुलाला आणि त्याच्या मित्राला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
सुनावणी दरम्यान बलात्काराचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. पोलिसांना पुरावे गोळा करता आले नाहीत, कारण हत्येच्या एका आठवड्यानंतर मृतदेह सापडल्याने वैद्यकीय तपासणी करणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन्ही दोषींची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली असली तरी हत्येप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
हेही वाचा :