Latest

हिंगोली : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील माय-लेकाचा मृत्‍यू; मातृदिनीच अपघाताने हळहळ

निलेश पोतदार

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली ते नरसी नामदेव मार्गावर भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी रात्री ही घटना घडली. सावित्रीबाई जेजेराम झाडे (वय ४५) व ज्ञानेश्वर जेजेराम झाडे (२४) अशी मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मातृदिनी झालेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

सेनगाव तालुक्यातील खुडज येथील सावित्रीबाई व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर हे दोघे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी वाहनावर ( एमएच.१४-जीक्यू-९४२९ ) हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात होते. त्यांचे दुचाकी वाहन ब्रह्मपुरी पाटीजवळ आले असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सावित्रीबाई यांचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली जाऊन उलटली.

दरम्यान याच वेळी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर सेनगाव येथे कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना हा अपघात दिसला. त्यांनी तातडीने त्यांचे वाहन थांबवून जखमी ज्ञानेश्वरला स्वतःच्या गाडीमध्ये बसवून उपचारासाठी हिंगोली येथे पाठवले. मात्र ज्ञानेश्वरची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला उपचारासाठी नांदेड येथे उपचारासाठी हलविले जात होते. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी नरसी नामदेव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिरी, उपनिरीक्षक अशोक कांबळे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सोमवारी ता. ९ दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मातृदिनीच झालेल्या या घटनेमुळे खुडज गावावर शोककळा पसरली आहे.

सेनगांवकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारमध्ये नवीन लग्न झालेले जोडपे व काही वर्‍हाडी मंडळी असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. पोलिस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच सर्वजण दुसऱ्या वाहनाने हिंगोलीकडे रवाना झाल्याचे ही पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT