पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर (वय ९३) यांचे आज (दि. ६) दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कैवारी, जवाई माझा भला या नाटकात त्यांनी भूमिका केल्या होत्या.
२१ नोव्हेंबर १९३० रोजी मोहनदास सुखटणकर यांचा जन्म झाला. सुखटणकरांचे बालपण गोव्यात गेले. म्हापशाच्या 'सारस्वत विद्यालय' या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच 'खोडकर बंडू' या छोटया नाटुकलीत काम केले. अभिनय येतो म्हणून नाही, तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून, आरोंदेकर मास्तरांनी त्या नाटुकलीत काम करायची त्यांना शिक्षा केली होती. त्या नाटुकल्याच्या निमित्ताने सुखटणकरांच्या गालाला जो पहिल्यांदा रंग लागला. तो कायमचा. नाटुकलीत खोडकर बंडूची प्रमुख भूमिका करून त्यांनी बक्षीस पटकावले. त्या वेळी प्रेक्षकांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. या नाटुकलीमुळेच सुखटणकरांना नाटकाची गोडी लागली.
त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर गोव्यातील प्रख्यात डॉक्टर होते. समाज सेवा म्हणून त्यांनी आरोग्य सेवा केली. त्यांची आईही स्वतंत्र विचारांची होती. सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या नाट्य क्षेत्रातील कारकिर्दीला सुरूवात केली. सुखटणकर यांना रंगकर्मी म्हणून घडविण्यात 'दी गोवा हिंदू असोसिएशन'चे मोठे योगदान राहिले आहे. या संस्थेत त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी 'कार्यकर्ता' म्हणून भूमिका निभावली.
रायगडाला जेव्हा जाग येते, 'कैवारी', 'जावई माझा भला', अशा गाजलेल्या नाटकांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. 'चांदणे शिंपीत जा', 'थोरली जाऊ', 'वाट पाहते पुनवेची', 'जन्मदाता', 'पोरका', 'प्रेमांकुर', 'निवडुंग' या मराठी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारली होती.
हेही वाचलंत का ?