Latest

पीकविमा भरण्यास मुदतवाढ देण्याची आमदार रोहित पवार यांची मागणी

अमृता चौगुले

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे वीजपुरवठा बंद होणं, नेटवर्क नसणं किंवा सर्व्हर डाऊन होणं आदी कारणांमुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी किमान दहा दिवस मुदतवाढ देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे. यंदा प्रथमच पीक विम्याचा शेतकऱ्यांचा हप्ता हा सरकारकडून भरण्यात येणार असून शेतकऱ्यांकडून केवळ नाममात्र १ रुपया घेण्यात येणार आहे. तसंच यंदा राज्यात पावसाची कमालीची असमानता दिसून आली. या पार्श्वभूमीवर पीक विमा योजनेकडे सर्वच शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने काही गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

तसेच वारंवार सर्व्हर बंद पडणे, नेटवर्क नसणे आदी कारणांमुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ३१ जुलैपर्यंतच्या काळात सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा भरता येईल, ही शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे या योजनेला किमान दहा दिवस मुदतवाढ देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांनाही ही अडचण सांगितली.

दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना पीकविमा भरता यावा म्हणून आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या यंत्रणेला प्रत्येक गावात पाठवून तिथे शेतकऱ्यांचे पीक विम्याचे फॉर्म मोफत भरुन घेण्यात येत आहेत. यामुळं शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळ वाचतोच पण अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यास मदत होत आहे.

पीक विमा मुदत वाढविण्यासाठी सरकार सकरात्मक

शेती हा बेभरवशाचा व्यवसाय आहे. सध्या पडत असलेला पाऊस पाहता सर्वच शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याकडे कल आहे. परंतु ऑनलाईन पीक विमा भरताना अनेक अडचणी येत आहे. हा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करून मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यावर मुदतवाढ देण्याबाबत त्यांनी मला आश्वस्त केलं आहे. तसंच सरकारशी केलेल्या चर्चेनुसार कुकडी कालव्यातून पाणी सोडण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यामुळं माझ्या मतदारसंघाला निश्चित दिलासा मिळेल.

-रोहित पवार आमदार, कर्जत-जामखेड 

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT