Latest

मला नऊशे खोके दिले..! आमदार प्रताप सरनाईक यांचा विरोधकांना टोला

दिनेश चोरगे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : पन्नास खोके घेतल्याचा आरोप करत एकीकडे विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर टीका केली जात असताना दुसरीकडे मला ९०० खोके दिले असल्याचा टोला शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी लगावला आहे. हे ९०० कोटी माझ्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदार संघातील प्रस्तावित असलेल्या विकासकामांसाठी दिले असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक निधी देण्यात आलेला माझा मतदारसंघ असून विकासाची दूरदृष्टी असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामांचेही कौतुक केले आहे.

सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून १८०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाण्यासाठी ९०० तर मीरा-भाईंदरसाठी ९०० कोटी देण्यात आले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील विकासकामाच्या संदर्भात सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन या सर्व महत्वाच्या प्रकल्पांना चालना देण्याची मागणी केली. पालिका आयुक्तांनीही या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी सरनाईक यांनी विरोधकांवरही टीका केली. विरोधक ५० खोक्यावरून नेहमी टीका करत असताना मात्र विरोधकांच्याच भाषेत बोलायचं झालं तर मला तर मुख्यमंत्र्यांनी ९०० खोके दिले असून ते माझ्या मतदार संघातील विकासकामांसाठी दिले असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

ईडीची कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार

ईडीच्या कारवाईबाबत पूर्व इतिहास तपासून घेणे आवश्यक असून दोन फ्लॅट आणि एक भूखंड जप्तीबाबत नायायालयाच्या निर्णयानुसार कारवाई होत असून यात कोणत्याही पक्षाचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सरनाईक यांना छेडले असता यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. यापूर्वी मागून मिळत नव्हते मात्र आता न मागता मिळत असल्याचे सांगत सरनाईक यांनी मंत्रिपदाचे संकेत यावेळी दिले.

मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही

खा. संजय राऊत यांनी शिंदे -फडणवीस सरकार पडणार असून, राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार आहे. त्यासाठी तयार रहा , असे आवाहन केले होते. सरनाईक यांनी राऊत यांचे विधान खोडून काढले असून हे सरकार चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता नसून सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. हे सरकार स्थापन होत असताना कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी देवीच्या दर्शनासाठी पुन्हा येणार असल्याचे साकडे घातले होते. त्यामुळे पुन्हा देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचेही सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

९०० कोटींमध्ये या कामांचा समावेश

मतदार संघातील विहिरींचे पुनर्जीवन,समाज भवन, मराठा भवन, चार तरण तलावांचा विकास,बाळासाहेब ठाकरे ऍक्वेरियम, विविध प्रकारच्या पाण्याच्या योजना तसेच उद्यानांचा कामांचा देखील समावेश करण्यात आला आहे. येत्या दीड महिन्यात या सर्व कामांच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे.

     हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT