

पुढारी ऑनलाइन डेस्क : प्रोडक्शन लिंक इनिशिएटिव्ह (पीएलआय) योजनेंतर्गत, 60 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणे अपेक्षित आहे. ही योजना म्हणजे नवीन रोजगार संधींचा उत्तम स्रोत आहे. तसेच मेक इन इंडिया असो किंवा स्थानिकांसाठी व्होकल, या सर्व योजना देशात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहेत. याचा अर्थ सरकारी आणि निमसरकारी नोक-यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युवकांना आज विविध ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवनियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. यामुळे देशातील ७१ हजार युवकांना रोजगार मिळाला आहे. यावेळी ते बोलत होते. यापूर्वी दीपावलीच्या मुहूर्तावर केंद्र शासनाकडून केंद्राच्या विविध विभागात जवळपास ७५ हजार नोकरी नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले होते. यानंतर रोजगार वितरण मेळाव्याचा हा दुसरा टप्पा आहे.
यावेळी पीएम मोदी म्हणाले, "मेक इन इंडिया असो किंवा व्होकल 4 लोकल, प्रत्येक योजना तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहे. या संधी भारताच्या प्रत्येक भागात आपल्या तरुणांपर्यंत पोहोचत आहेत. खाजगी कंपन्यांसाठी अंतराळ क्षेत्र उघडल्यामुळे तरुणांना फायदा होत आहे."
रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे. रोजगार मेळा पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि थेट राष्ट्रीय विकासात सहभागी होण्यासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. याआधी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळ्याअंतर्गत ७५,००० नव्याने नियुक्ती झालेल्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.
ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम सुरू
आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रोजगार मेळ्यात सर्व नवीन नियुक्त्यांसाठी 'कर्मयोगी प्ररंभ मॉड्यूल – ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम' सुरू केला.
हे ही वाचा :