मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विदेशातून काळा पैसा देशात परत आणून नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील कथित वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल करत केल्याने बुधवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. (MLA Bhaskar Jadhav)
देशाच्या पंतप्रधान मोदी यांची अंगविक्षेप करून नक्कल करणाऱ्या जाधव यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरली. अखेर जाधव यांनी आपण केलेले वक्तव्य मागे घेत आहे. तसेच नक्कल बद्दल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागत असल्याचे सांगितले. त्यानंतर या वादावर पडदा पडला.
राज्यातील वीज ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिल आणि विजेची कनेक्शन तोडली जात असल्याबद्दल लक्षवेधी सूचनेवर ऊर्जामंत्री नितीन राऊत हे उत्तर देत होते. १०० युनिट पर्यंत वीज माफ करण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. त्याची आठवण भाजपचे सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी करून दिली. त्यावर १०० युनिट पर्यंत वीज माफ करण्याचे माझे व्हिजन होते.
पण कोरोना संकटामुळे ते शक्य झाले नाही. पण नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत काळा पैसा आणून नागरिकांना १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, असे वक्तव्य केले. तोच धागा पकडून भास्कर जाधव यांनी , पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची नक्कल केली. याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला.
पंतप्रधान मोदी यांनी असे वक्तव्य कधीही केलेले नाही. पण त्यापेक्षा जाधव यांनी अंगविक्षेप करत पंतप्रधान मोदी यांचा अवमान केला आहे. याबाबत जाधव यांना निलंबित करा. त्यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे, असे फडणवीस यांनी बजावले.
त्यावर, जाधव यांचे वक्तव्य तपासून बघावे. त्यानंतर योग्य ती कारवाई करावी, असे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी, जाधव यांचे वक्तव्य तपासून घेतो, असे सांगितले. पण त्यावर भाजपच्या सदस्यांचे समाधान झाले नाही.
तुमच्या नेत्यांची नक्कल केली तर चालेल का, असा सवाल फडणवीस यांनी केला. २०१४ च्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची मी नक्कल केली, असे जाधव सांगू लागले. तेव्हा भाजपच्या सदस्यांनी वेलमध्ये येऊन घोषणा दिल्या.
माफी मागितल्या शिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असे फडणवीस म्हणाले. तेव्हा मी जाधव यांचे समर्थन करत नाही, तपासून निर्णय घ्यावा,असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले. यापूर्वी नेत्यांच्या बद्दल केलेल्या वकव्याबद्दल विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाचे सुधीर मुनगंटीवार यांनी दाखले दिले.
आपण वक्तव्य आणि अंगविक्षेप मागे घेतो, असे जाधव यांनी सांगितले. तोच मुद्दा पकडुन जाधव यांनी अंगविक्षेप केल्याची कबुली दिली आहे. अंगविक्षेप मागे घेता येत नाही. माफी मागा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. यावरून सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. अखेर, पंतप्रधानपदाचा अवमान करण्याचा माझा विचार नव्हता. मी असंसदीय शब्द वापरले नाहीत. पण माझ्याकडून चूक झाली असेल तर माफी मागतो, असे भास्कर जाधव यांनी सांगितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.