Latest

‘ही’ भानगड फेसबुकच्या अंगलट; मिटवण्यासाठी मोजणार तब्बल ६२ अब्ज रुपये | Cambridge Analytica

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन : फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटाला एका प्रकरणात मोठा फटका बसला आहे. वापरकर्त्यांच्या डेटाचा गैरवापर केल्या प्रकरणी सुरू असलेला एक खटला मिटवण्यासाठी फेसबुक तब्बल ७२५ दशलक्ष डॉलर इतकी रक्कम मोजणार आहे. भारतीय चलनात ही रक्कम जवळपास ६२ अब्ज रुपये इतकी होते. (Cambridge Analytica)

२०१८मध्ये पुढे आलेले केंब्रिज अॅनालायटिक प्रकरणात सुरू असलेला खटल्यातून मान सोडवण्यासाठी मेटालाही रक्कम मोजावी लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

केंब्रिज अॅनालायटिका हे प्रकरण त्या वेळी बरेच गाजले होते. केंब्रिज अॅनालायटिका ही राजकीय सल्लागार आणि डेटासंदर्भात काम करणारी संस्था होती. डोनाल्ड ट्रंप यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनवण्यात या संस्थेचा फार मोठा वाटा होता. या संस्थेने ८ कोटी ७० लाख फेसबुक युजर्सचा डेटा मिळवला. त्याचा वापर करून सायकोग्राफिक विश्लेषण करून या युजर्सना त्यांच्या मानसिकेतनुसार जाहिरातींद्वारे टार्गेट करण्यात आले. केंब्रिज अॅनालायटिका आणि इतरही थर्ड पार्टी कंपन्यांना वापरकर्त्यांच्या डेटा पुरवण्याचा प्रकार पुढच्या काळात बराच गाजला. यातून फेसबुकवर खटला तर दाखल झालाच तर दुसरीकडे फेसबुक वापरकर्त्यांच्या डेटाबद्दलची सुरक्षितता, प्रायव्हसी हे मुद्देही चव्हाट्यावर आले.

Cambridge Analytica प्रकरणात मोजावे लागणार ६२ अब्ज रुपये

मेटाने गुरुवारी न्यायालयात या प्रकरणातील तडजोडीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. यात या रक्कमेचा उल्लेख आहे. याचिककर्त्यांचे म्हणणे असे आहे की मेटाने देऊ केलेली रक्कम अमेरिकेतील डेटा प्रायव्हसी संदर्भातील सर्वांत मोठी रक्कम आहे, तसेच यापूर्वीच्या कोणत्याही प्रकरणात फेसबुकने इतकी मोठी रक्कम देऊ केलेली नाही. ही तडजोड ऐतिहासिक असेल. प्रायव्हसी संदर्भातील किचकट

अशा खटल्यात ही एक अर्थपूर्ण अशी तडजोड असेल, असे वकील डेरेक लुईजर आणि लेसली व्हिवर यांनी म्हटले आहे.
पण मेटाने आपण कोणतीही चूक केल्याचे मान्य केलेले नाही. तसेच या तडजोडीच्या प्रस्तावाला न्यायमूर्तींनी मंजुरीही दिलेली नाही. मेटाने ही तडजोड कम्युनिटी आणि शेअरहोल्डर यांच्या हिताची असल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांत प्रायव्हसीसंदर्भात आम्ही मोठ्या सुधारणा केल्या आहेत, असेही मेटा म्हणते.

२०१६ला केंब्रिज अॅनालायटिका डोनाल्ड ट्रंप यांच्यासोबत कार्यरत होती. पण हा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर ही कंपनी गुंडाळण्यात आली. या खटल्यात वापरकर्तांच्या वकिलांचा दावा असा आहे की, "वापरकर्त्यांना असे वाटत होते की डेटावर त्यांचे नियंत्रण आहे. पण प्रत्यक्षात फेसबुकने बाहेरच्यांना डेटा वापराची परवानगी दिली."

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT