Latest

The French Open : मेदवेदेव्ह पहिल्याच फेरीत पराभूत; स्वायटेकची आगेकूच

Shambhuraj Pachindre

पॅरिस; वृत्तसंस्था : दुखापतीने त्रस्त डॅनियल मेदवेदेव्हला येथे सुरू असलेल्या फ्रेंच टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. ब—ाझीलियन पात्रताधारक खेळाडू थियागो सेबोथने मेदवेदेव्हला 7-6 (5), 6-7 (5), 2-6, 6-3, 6-4 अशा फरकाने पराभवाचा जबरदस्त धक्का दिला. (The French Open)

सेबोथ या हंगामात क्ले कोर्टवर सलग दोन स्पर्धा जिंकत येथे दाखल झाला आहे तर दुसरीकडे, जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित मेदवेदेव्हने रोममधील स्पर्धा जिंकत येथे आव्हान उभे केले होते. मात्र, सेबोथने अचानक आपला खेळ उंचावल्यानंतर मेदवेदेव्हसमोर येथे काहीच उत्तर नव्हते. सेबोथने 4 तास 15 मिनिटांच्या मॅरेथॉन लढतीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (The French Open)

मी ज्युनियर गटात खेळायचो, त्यावेळेपासूनच मेदवेदेव्हच्या खेळाचे निरीक्षण करत आलो आहे. एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्याच्यावर मात करता आली, याचा आनंद अनोखा आहे, असे जागतिक क्रमवारीत 172 व्या स्थानी असलेल्या सेबोथने येथे नमूद केले. मी त्याच्याविरुद्ध खेळताना फोरहँडवर अधिक भर दिला. दुसर्‍या सेटमध्ये मला थोड्याफार वेदना जाणवल्या. पण, सर्वोत्तम खेळ साकारणे, हेच माझे मुख्य लक्ष्य होते आणि मी त्यात सुदैवाने यशस्वी ठरलो, याचा त्याने पुढे उल्लेख केला.

मेदवेदेव्हने पहिल्या सेटमध्ये प्रतिस्पर्धी सेबोथची सर्व्हिस जरुर भेदली. पण, नंतर सेबोथने सारे हिशेब चुकते करत हा सामना आपल्या खिशात टाकला. विशेषत: दुसर्‍या सेटमध्ये त्याने परतीचे जोरदार फटके लगावत मेदवेदेव्हला पुरते हैराण करून टाकले. दुसर्‍या टायब—ेकमध्ये मेदवेदेव्हने दोन सेट पॉईंट वाचवले होते.

अन्य लढतीत डॅनिश टेनिसपटू, सहाव्या मानांकित होल्गर रुनने फ्रेंच ओपनमधील पदार्पणवीर ख्रिस्तोफर यूबंक्सशला 6-4, 3-6, 7-6 (2), 6-2 अशा फरकाने पराभूत केले. रुनने गतवर्षी या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली होती. 20 वर्षीय रुनने म्युनिच टायटल जिंकले असून मॉन्टे कार्लो व रोममध्ये उपजेतेपदापर्यंत धडक मारली असून यंदाही त्याच्याकडून बर्‍याच अपेक्षा असणार आहेत.

महिला एकेरीत स्वायटेकची आगेकूच

या स्पर्धेतील अन्य लढतीत जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित इगा स्वायटेकने स्पेनच्या ख्रिस्तियाना बुस्काचा 6-4, 6-0 अशा एकतर्फी फरकाने फडशा पाडत विजयी सलामी दिली. चार वर्षांत तिसर्‍यांदा फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या स्वायटेकने प्रारंभी संथ सुरुवात केली. पण, नंतर केवळ तासाभरातच तिने सहज विजय नोंदवला. वास्तविक, दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या इटालियन ओपन स्पर्धेत स्वायटेकला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. मात्र, येथे तिने आपण पूर्ण तंदुरुस्त असल्याचा या विजयातून दाखला दिला. जागतिक क्रमवारीत 70 व्या मानांकित बुस्काने खेळात वैविध्य आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. पण, यात तिला फारसे यश मिळाले नाही.

कोको गॉफची पिछाडी भरून काढत रोमांचक बाजी

अमेरिकेच्या सहाव्या मानांकित कोका गॉफने पहिल्या टप्प्यातील चुका सुधारत स्पेनच्या रेबेका मॅसारोव्हाविरुद्ध 3-6, 6-1, 6-2 असा पिछाडी भरून काढणारा विजय नोंदवला. गतवर्षी उपविजेती ठरलेली गॉफ येथे पहिल्या सेटमध्ये फोरहँडचे फटके चुकत असल्याने दडपणाखाली होती. जागतिक क्रमवारीतील 71 वी मानांकित मॅसारोव्हाने याचा पुरेपूर लाभ घेत पहिल्या सेटमध्ये धडाकेबाज बाजी मारली व गॉफला धक्का देण्याची उत्तम पायाभरणी केली. 19 वर्षीय गॉफने दुसर्‍या सेटपासून मात्र बहारदार खेळ साकारत रोमांचक विजय मिळवला.

याशिवाय, इलेना रिबाकिनाने झेकची पात्रताधारक खेळाडू ब—ेन्डा फु्रविर्तोवाला 6-4, 6-2 अशा सरळ सेटसमध्ये पराभूत केले. जागतिक क्रमवारीतील सातव्या मानांकित ओनस जॅबेरने इटलीच्या बिगरमानांकित लुसिया ब—ोन्झेट्टीचे आव्हान 6-4, 6-1 अशा एकतर्फी फरकाने संपुष्टात आणले. चौथ्या मानांकित कॅस्पर रुडने स्विडीश पात्रताधारक इलियास यमेरला 6-4, 6-3, 6-2 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. कॅस्परचे येथे सलग दुसर्‍यांदा या स्पर्धेत फायनलमध्ये धडक मारण्याचे पहिले लक्ष्य असेल.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT