सांगली जिल्ह्यात सध्या शेअर्स, डॉलरमध्ये गुंतवणुकीचा भूलभुलैय्यातून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखविले जाते आहे. यात अनेकांना लाखो रुपयांचा गंडा बसला आहे. 'व्याजाला भुलले अन् मुदलाला मुकले' अशी बिकट अवस्था अनेक गुंतवणूकदारांची झाली आहे. याबाबत जिल्ह्यातील बँकिंग व अर्थतज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्याही आर्थिक संस्थेला 15 ते 20 टक्के परतावा देणे शक्य नाही, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
अलिकडे मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल आहे. यासाठी मोठा गाजावाजा केला जात आहे. यामध्ये लोकांपुढे केवळ गुंतवणूक करून लाखो रुपये मिळवणार्यांची फक्त उदाहरणे येत आहेत. दुर्दैवाने यामध्ये कोट्यवधी रुपये फसवणूक झालेल्यांची उदाहरणे समोर येत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत केंद्र सरकारची अशा प्रकारच्या गुंतवणुकीला अधिकृत मान्यता मिळत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य ग्राहकांनी यामध्ये गुंतवणूक करणे उचित नाही.
पलूस सहकारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष वैभव पुदाले म्हणाले, सध्या जिल्ह्यात काही आर्थिक संस्थांकडून एक लाखाला पाच ते दहा टक्के दरमहा परतावा देण्याची योजना सुरू आहे. आत्तापर्यंत अशा कोणत्याही योजना यशस्वी झालेल्या नाहीत. त्यामुळे कित्येक लोकांचे पैसे बुडालेले आहेत. आज कोणत्याही को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे गुंतवले तर त्या ग्राहकाला एक लाख ते पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण आहे. को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये कमी व्याज मिळते म्हणून लोक जादा व्याजाच्या अमिषापोटी अशा योजनांमध्ये पैसे गुंतवतात आणि एक दिवस फसतात. नागरिकांनी आता तरी बळी पडणे थांबवावे.
माजी महापौर व सांगली क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घालणार्या अनेक संस्था बाजारात येत आहेत. वास्तविक पाहता 1 टक्के ते 7 टक्क्यांपर्यंत परतावा देणार्या शासकीय नियमांचे पालन करून काम करणार्या काही संस्था आहेत. त्यांच्या काहीही तक्रारी नाहीत. परंतु 15 टक्क्यांवर परतावा देणार्या संस्था असतील तर त्या हमखास फसवणूक करणार्या आहेत, असे समजावे. ज्यांना कोणीही बँका कर्ज देत नाहीत, अशा लोकांना या संस्था कर्ज देत असतात. त्यांचे धंदे बुडाले की संस्था या अडचणीत येणारच. याबरोबरच आता ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढलेले आहेत. स्वतः कोणतीही खात्री न करता ऑनलाईन गुंतवणूक केली जाते. फसवणूक होते. संबंधितांवर कारवाई करता येत नाही. त्यामुळे अशा फसवणुकीला बळी पडू नये.
इस्लामपूर अर्बन बँकचे अध्यक्ष संदीप पाटील म्हणाले, सहकारी बँका या सभासदांच्या विश्वासार्हतेवर टिकून आहेत. या बँकातील ठेव ही सुरक्षित ठेव असते. आता बँकामधील 5 लाखांपर्यंतच्या ठेवीला विमा संरक्षणही मिळाले आहे. असे असताना अनेकजण जादा व्याजाच्या आमिषाने इतरत्र गुंतवणूक करून फसवणुकीला बळी पडत आहेत. 'हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्या'चा हा सर्व प्रकार आहे.
नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन को-ऑप. सोसायटी, इस्लामपूरचे संस्थापक राहुल महाडिक म्हणाले, सध्या शेअर मार्केटच्या नावाखाली ठेवीदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत. जादा व्याजाच्या हव्यासापोटी अनेकांनी आपल्या ठेवीवरच पाणी सोडले आहे. तालुक्यात असे अनेक प्रकार घडले आहेत. कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून अनेक दलालांनी पलायन केले आहे. अशा दलालांच्या नादाला ठेवीदारांनी लागू नये. विश्वासाहर्र्ता असलेल्या बँकांमध्येच गुंतवणूक करावी.
एम.डी. पवार पीपल्स बँकेचे मार्गदर्शक संचालक वैभव पवार म्हणाले, बँकांचा व्याजदर कमी असला तरी येथे ठेवी सुरक्षित असतात. खासगी गुंतवणूकदार जादा व्याजाचे आमिष दाखवत असले तरी तेथे गुंतवणूकदारांच्या ठेवी सुरक्षित नसतात. त्यामुळे ठेवीदारांनी आपण जेथे गुंतवणूक करतो त्या संस्थेची पार्श्वभूमी, सर्व चौकशी करूनच पैशांची गुंतवणूक केली पाहिजे. नंतर पश्चातापाची वेळ येऊ नये. जादा व्याजाचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाली आहे. मात्र बदनामीला भिऊन काहीजण त्याची वाच्यता करीत नाहीत.
मामासाहेब पवार सत्यविजय सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार म्हणाले, आज संपूर्ण राज्यातील को-ऑपरेटिव्ह बँका रिझर्व्ह बँकेने दिलेल्या नियमांचे पालन करून ग्राहकांना गुंतवणुकीवर योग्य तो मोबदला देतात. परंतु आज जिल्ह्यात चाललेल्या बोगस स्कीममुळे लोक हातोहात फसविले जात आहेत. महिन्याला 15 ते 20 टक्के परतावा देणे शक्य नाही. नागरिकांनी आमिषाला बळी न पडता सुरक्षित अशा कोणत्याही बँकेत आपले पैसे गुंतवावेत.
ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानचंद्र पाटील म्हणाले, कोणतीही आर्थिक संस्था सुरू करताना इतर सरकारी परवान्याबरोबर रिझर्व्ह बँकेची परवानगी अत्यावश्यक आहे. परंतु सध्या अनेक संस्था अशी कोणतीही परवानगी न घेता सर्रास दुकाने थाटत आहेत. ग्राहक त्यांच्या व्याजाच्या परताव्यास भुलत आहेत. अशी फसवणूक झालेल्या ग्राहकांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे थेट तक्रार करावी.
भारतासारख्या विकसनशील देशात आर्थिक निरक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे विशेषत: ग्रामीण भागात जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. नवश्रीमंत वर्ग उदयाला आला आहे. या श्रीमंतीचा हव्यास असणारे लोक याला बळी पडत आहेत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनी, सहकारी संस्थांनी लोकांमध्ये विश्वास वाढविल्यास लोक अशा गुंतवणुकीला बळी पडणार नाहीत.
– प्रा. संजय ठिगळे, अर्थशास्त्राचे अभ्यासकजिल्ह्यातील सर्व सहकारी बँका सक्षम आहेत. परंतु गेल्या वर्षभरात जिल्ह्यात अनेक भूलभुलैय्याच्या स्कीम आल्या आहेत. अशा स्कीमांमुळे अनेक सामान्य नागरिक जादा व्याज मिळण्याच्या आमिषाला बळी पडतात. नंतर पोलिस ठाण्यांत हेलपाटे मारतात. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता कोणत्याही सहकारी बँकेत पैसे ठेवले तर ते सुरक्षित राहतील.
– सुधीर जाधव, अध्यक्ष, सांगली बँक असोसिएशन