कोल्हापूर; पूनम देशमुख : आई होणं हा स्त्रीसाठी पुनर्जन्मच असतो. ही उक्ती बहुतांशी महिला प्रसूतीकाळात अनुभवतात. वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे अनेक दाखले समोर असले तरी आजही प्रसूतीकाळात मातांचा जीव धोक्यात येणार्या घटना घडत आहेत. जिल्ह्यात गेल्या 4 वर्षांत तब्बल 121 मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला असून त्यातही दिलासादायक बाब म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा 5 टक्के माता मृत्यूचे प्रमाण घटले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांनी दिली. (National Safe Motherhood Day)
माता मृत्यू होण्याचे प्रमाण ग्रामीणसह शहरी भागातही असून आरोग्य विभागाच्या पाहणीत ग्रामीण व शहरी स्तरावरील माता मृत्यू होण्याची कारणे वेगवेगळी आहेत. उच्च शिक्षण व लग्नासाठी वाढते वय यामुळे शहरी मुलींमध्ये गर्भधारणेपासून ते प्रसूतीकाळापर्यंत समस्या दिसून येतात, तर शारीरिक कष्ट, गरोदरपणात आहाराकडे दुर्लक्ष, कमी अंतराने राहणारी गर्भधारणा यामुळे ग्रामीण भागातील मातांना प्रसूतीकाळात धोका निर्माण होत आहे.
सध्या नव्वद टक्के प्रसूती रुग्णालयात होत असल्याने माता मृत्यू दर घटला आहे. तसेच जेएसके, पीएमएसवाय या योजनांचीही माता मृत्यू रोखण्यात मदत होत आहे. 2017 सालापासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून जिल्ह्यातील 1 लाख 28 हजार 184 गर्भवतींसाठी 55 कोटी 14 लाख 35 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. गर्भावस्थेदरम्यान लोह, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम योग्य प्रमाणात आहारातून घेणे, दर तीन महिन्यांनी सोनोग्राफी करणे,गर्भवतीकाळात होणार्या रक्तस्रावाकडे दुर्लक्ष न करणे, अतिशारीरिक कष्टाची कामे टाळणे गरजेचे असून सद्य:स्थितीत माता मृत्यूसाठी प्रसूती पूर्व उच्च रक्तदाब, अतिरक्तस्राव, जंतूदोष आणि रक्तक्षय ही कारणे कारणीभूत आहेत.(National Safe Motherhood Day)
आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल, अनुसूचित जाती जमाती महिलांना प्रसूतीनंतर आर्थिक मदत देणारी जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, गर्भवती काळातील तपासणी, प्रसूतीपूर्व सेवा, समुपदेशन, जोखमीनुसार चाचणी यासाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुरू आहे. प्रत्येक गर्भवती महिलेची नोंदणी करून प्रसूतीनंतर तीन टप्प्यात पाच हजार रुपये आर्थिक मदत देणारी प्रधानमंत्री मातृवंदना योजना.
सन 2005 पासून 10 जुलै हा दिवस मातृ सुरक्षा दिन म्हणून साजरा होतो. जागतिक आरोग्य संघटनेने याची अंमलबजावणी सुरू केली असून याव्दारे मातेचे संगोपन आणि मातृत्वादरम्यानच्या कालावधीत होणार्या मातांच्या मृत्युदरातील वाढ, त्यांची होणारी परवड रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (National Safe Motherhood Day)
वर्षभरात जिल्ह्यातील प्रसूतीकाळातील माता मृत्यूचे प्रमाण 34 टक्क्यांवरून 29 टक्क्यांपर्यंत आणले आहे. राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबवण्यात येणार्या योजनांची माहिती प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषता जोखमीच्या प्रसूतीवेळी माता मृत्यूची शक्यता वाढते. त्यामुळे गर्भवती काळातच महिलांनी आरोग्याबाबत व आहाराबाबत दक्षता राहणे गरजेचे आहे.
– डॉ. योगेश साळी,
जिल्हा आरोग्य अधिकारी
हेही वाचा :