Latest

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : निजामांच्या खुणा पूसून टाकू: मुख्यमंत्र्यांची ग्वाही

backup backup

औरंगाबाद; पुढारी ऑनलाईन : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : संतपीठ हे प्रेक्षणीय स्थळ राहता कामा नये, निजामकालीन दीडशे शाळांचा विकास करू. निजामांच्या कोणत्याही खुणा राहणार नाहीत याची काळजी घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

ते औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

ज्याप्रमाणे मराठवाडा निजामांशी लढला तसे आपण कोविडशी लढू. निजामशाहीच्या कोणत्याही खुणा आपल्याला ठेवायच्या नाहीत.

परभणीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करू, अशी घोषणाही त्यांनी केली.

औरंगाबादमध्ये अनेक विकासकामे झाली, ती विरोधकांना दिसत नाही. औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरू करण्याचा संकल्प आहे.

अहमदनगर आणि औरंगाबाद रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी आम्ही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विनंती करणार आहे, असेही ते म्हणाले.

संतपीठ मोठे विद्यापीठ व्हावे

पैठण येथे स्थापन करण्यात आलेले संतपीठ हे भविष्यात मोठे विद्यापीठ व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.१७) येथे व्यक्त केली.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी अभिवादन करून ध्वजारोहण केले. त्यावेळी ते बोलत होते. पैठण येथे संतपीठ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत संतपीठ चालविले जाणार असून, भविष्यात त्याचे मोठ्या विद्यापीठात रुपांतर होवून जगभरातील अभ्यासक येथे आले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

निजामकालीन शाळांचे निशाण मिटविणार

मराठवाड्यातील १५० निजामकालीन शाळांचे पुनर्विकास केला जाणार आहे. निजामकालीन शाळा हे काही वैभव नाही. निजामाचे नामोनिशाण आम्हाला मिटवायचे आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार उदय राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

औरंगाबाद- शिर्डी विमानसेवा

पर्यटनाला चालना देण्यासाठी औरंगाबाद ते शिर्डी विमानसेवा सुरू करण्याबरोबरच औरंगाबाद – नगर रेल्वे मार्गाला चालना दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

एमआयएमला लगावला टोला

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचे एमआयएमने विविध ठिकाणी फुले उधळून उपहासात्मक स्वागत केले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आमच्या सरकारने विकासकामे करण्यास आता सुरुवात केली आहे. रस्त्याच्या सध्याला स्थितीला तुम्ही विकास म्हणत असाल तर हा विकास तुम्हाला लखलाभ ठरो, असे ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा

  •  उस्मानाबादेत वैद्यकीय महाविद्यालय
  •  हिगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग
  • मराठवाड्यात २०० मेगावॅट सौर उर्जा प्रकल्प
  • औरंगाबाद शहरातील गुंठेवारीच्या नियमितकरणास गती
  • घृष्णेश्वर मंदिरात २८ कोटी खर्चून सभामंडप बांधणार

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT