Latest

Delhi Crime | महिलेवर बलात्कार करुन तिच्या अंगावर ‘गरम डाळ’ ओतली, दिल्लीतील धक्कादायक घटना

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमधील एका महिलेवर तिच्या मित्राने आठवडाभर नवी दिल्लीत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तसेच सदर पीडित महिलेचा छळ केला. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणातील दिल्लीतील संशयित व्यक्तीने पीडित महिलेवर "गरम मसूर डाळ" ओतल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Delhi Crime)

या प्रकरणी २८ वर्षीय संशयित आरोपी पारस याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि दुखापत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिच्या शरीरावर जवळपास २० जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. तिला नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला पारससोबत दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागात भाड्याने एका महिन्यापासून राहत होती. तिची पारससोबत मागील ३ ते ४ महिन्यांपासून मैत्री होती.

३० जानेवारी रोजी नेब सराय पोलिस स्थानकाला एक डिस्ट्रेस कॉल आला. ज्यावरुन एका महिलेला तिच्या जोडीदाराने मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती. या घटनेची तत्त्काळ गंभीर दखल घेत एक पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि सदर महिलेची सुटका करण्यात आली. तिला तातडीने एम्समध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर संशयित व्यक्तीला २ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, जानेवारीच्या सुरुवातीला घरकामाच्या नोकरीसाठी बंगळूरूला जाण्याचा तिचा विचार होता. पण, पारसला भेटण्यासाठी ती दिल्लीत थांबली. त्याने तिला नोकरी शोधण्यास मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आणि तिला दिल्लीतच राहण्यास सांगितले होते, असे 'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

"पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता पीडितेने सांगितले की ती पश्चिम बंगालमधील मूळची दार्जिलिंगची आहे आणि फोनवरून ती संशयिताच्या संपर्कात आली," असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

त्यानंतर पारसने तिच्यावर एक आठवडा लैंगिक अत्याचार केला. तिला मारहाणही केली. धक्कादायक म्हणजे पारसने तिच्या अंगावर गरम मसूर डाळ ओतली. परिणामी ती भाजून जखमी झाली, असे पोलिसांनी सांगितले.

पीडितेच्या तक्रारीवरून, ३० जानेवारी रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ (दुखापत करणे), ३७६ (बलात्कार) आणि ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले.

पारस हा मूळचा उत्तराखंडचा असून तो दिल्लीतील एका स्थानिक भोजनालयात स्वयंपाकी म्हणून कामाला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Delhi Crime)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT