फटाका कारखाना स्फोटात 11 ठार | पुढारी

फटाका कारखाना स्फोटात 11 ठार

हरदा; वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील हरदा येथे अवैध फटाका कारखान्यात स्फोट होऊन 11 जण मृत्युमुखी पडले; तर दोनशेवर लोक जखमी झाले. मगरधा रोडवरील बैरागड गावात मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्फोट इतका भयंकर होता की, मजुरांचे मृतदेह उडून लगतच्या रस्त्यावर पडले. घटनेनंतर लगेचच 25 वर गंभीर जखमींना हरदा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 7 अत्यवस्थ रुग्णांना येथून भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात हलविण्यात आले.

माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे कारण सध्या समजू शकलेले नाही. हरदा आणि आसपासच्या जिल्ह्यांतून 114 रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.

मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मंत्रालयात तातडीची बैठक बोलावली. मंत्री उदय प्रताप सिंह तसेच संबंधित अधिकार्‍यांना तातडीने हेलिकॉप्टरने हरदा येथे जाण्याच्या सूचना दिल्या. भोपाळ, इंदूर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि एम्स भोपाळमधील बर्न युनिटला उपचारासाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले.

काय म्हणतात तहसीलदार?

हरदा तहसीलदार लवीना घागरे यांनी सांगितले की, याआधी एका तक्रारीवरून त्याला सील ठोकले होते. राजेश अग्रवाल राजू, सोमेश, सोमू, प्रदीप अग्रवाल यांच्या मालकीच्या जागेवर तो सुरू होता.

काही मृतांची नावे : बानो बी सलीम, प्रिया मुन्नालाल प्रजापती (रा. खेडीपुरा), मुबीन शकूर खान, आबिद रहमान खान (रा. मानपुरा), अनुज भा. कुचबंदिया (रा. हरदा), उषा मुकेश बेलदार, मुकेश तुलसीराम (रा. बैरागड).

Back to top button