श्रीगोंदा : चालू वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाला. त्यातच कुकडी-घोडच्या पाण्याची शाश्वती नसल्याने शेतकर्यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरविली आहे. हजारो हेक्टरवर ऊस लागवड करणार्या श्रीगोंदा तालुक्यात उसाचे क्षेत्र साठ टक्क्यांनी घटले आहे. परिणामी पुढील वर्षीचा साखर कारखान्याचा गाळप हंगाम धोक्यात येणार आहे. श्रीगोंदा तालुका उसाचे आगर समजले जाते. दरवर्षी पंचवीस लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊस गाळप होते. मात्र, दोन वर्षांत पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम उसाच्या क्षेत्रावर झाला आहे. चालू वर्षीही उसाचे क्षेत्र कमी असल्याने तालुक्यातील कारखान्याचा गाळप हंगाम लवकरच आटोपणार आहे.
संबंधित बातम्या :
चारपैकी तीन कारखाने उसाचे गाळप करत असले तरी, ऊस मिळविण्यासाठी कारखानदारांची धडपड सुरू आहे. चालू वर्षी भावाची स्पर्धा जोरात सुरू आहे. हिरडगाव येथील गौरी शुगरने तीन हजारपेक्षा जास्त भाव देऊन तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांची गळचेपी केली आहे. गौरी शुगरच्या तोडीस तोड भाव देण्याच्या दोन्ही कारखान्यांच्या हालचाली सुरू असल्या तरी, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. उसाला भाव चांगला असला तरी, पुढील वर्षी पाण्याची अडचण जाणवणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांनी ऊस पीक चालू वर्षी तरी नकोच, अशी भूमिका घेतली आहे. घोड पट्ट्यात काही प्रमाणात ऊस लागवड झाली असली तरी, तुलनेत ती कमीच आहे, असे जाणकारांचे मत आहे.
कुकडी पट्ट्यात तर ऊस लागवड एकदम अत्यल्प झाली आहे. कुकडी प्रकल्पात यावर्षी चांगला पाणीसाठा असला तरी, आवर्तन वेळेवर मिळत नसल्याने त्याचा परिणाम थेट ऊस क्षेत्रावर झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक एका पाण्याने जात असल्याने कुकडी पट्ट्यातील शेतकर्यांनी ऊस लागवड न करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
गाळपावर होणार परिणाम
तालुक्यात दरवर्षी उसाचे क्षेत्र अधिक असल्याने कारखादारांच्या हातापाया पडण्याची वेळ शेतकर्यांवर येते. चालू गाळप हंगामात तरी थोड्याफार प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. पुढील वर्षी मात्र यापेक्षा बिकट अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. आजची परिस्थिती पाहता पुढील वर्षी कारखान्याचे गाळप सुरू होतील की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
ऊस लागवड कमीच : सुपेकर
श्रीगोेेंद्यात दरवर्षी आडसाली अन् सुरू, असे मिळून पंधरा हजार हेक्टरवर उसाची लागवड होते. मात्र, पाऊस कमी प्रमाणात झाल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळले आहेत. उसाला अधिक पाणी लागत असल्याने व पाण्याची शाश्वती नसल्याने लागवड कमी झाल्याचे तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी सांगितले.
उसाला बाजार चांगला पण…!
बाजारभावामुळे उसाला आता चांगले दिवस आले आहेत. पण, पावसाचे कमी प्रमाण, कुकडीचे आवर्तन बेभरवशाचे असल्याने, त्यापेक्षा यंदाच्या वर्षी ऊसच नको, असा निर्णय घेऊन टाकला आहे. तो खोड ऊस शेतकर्यांनी मोडून टाकला आहे, असे ऊस उत्पादक शेतकरी नवनाथ सुद्रीक यांनी सांगितले.