पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात खासदारकी गमावलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा आता नव्या वादात सापडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहादराई यांनी मंगळवारी (दि. २) मोईत्रा यांच्यावर नवे आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये एका ओळखीच्या व्यक्तीवर पाळत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रेमप्रकरणामुळे या व्यक्तीवर मोईत्रा यांनी बेकायदेशीर पाळत ठेवल्याच्या आराेप देहादराई यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहादराई यांनी मंगळवारी (दि. २)दावा केला की, महुआ मोईत्रा यांनी माजी प्रियकरावर पाळत ठेवली. सुहान मुखर्जी असे पाळत ठेवण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे देहादराई यांनी एका पत्रात म्हटले आहे.
29 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि CBI संचालक प्रवीण सूद यांना लिहिलेल्या पत्रात देहादराई यांनी म्हटले आहे की, TMC नेत्या मोईत्रा या स्वत:च्या फोनवरुन एका व्यक्तीचे वास्तव्य असलेल्या स्थानांचा मागोवा घेत असल्याची शक्यता आहे. या पत्रात आरोप करत म्हटले आहे की, मोईत्रा यांनी खासगी व्यक्तींचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) मिळविण्यासाठी पश्चिम बंगाल पोलिसांच्या काही वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधून आपल्या अधिकाराचा आणि संबंधांचा गैरवापर केल्याची माहिती आहे.
देहादराई यांच्या म्हणण्यानुसार, "मोइत्रा यांनी यापूर्वी मला तोंडी आणि लेखी (26.09.2019 रोजी व्हॉट्स ॲपवर) अनेकवेळा कळवले होते की,त्यांच्या माजी प्रियकर सुहान मुखर्जीवर सक्रियपणे लक्ष ठेवून होत्या. कारण त्यांना मुखर्जी यांचे एका जर्मन महिलेशी प्रेमसबंध असल्याचा संशय होता."
देहादराई यांनी आपल्या तक्रारीत फोनवरील संवादाचे स्क्रीनशॉट आणि कथित सीडीआर यादी संलग्न दिली आहे. "बंगाल पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मदतीने मोईत्रा यांच्याकडे त्यांच्या माजी प्रियकराचा संपूर्ण कॉल तपशील रेकॉर्ड आहे, हे जाणून मला धक्का बसला आहे. यामध्ये त्यांच्या माजी प्रियकराच्या संपर्कात असलेल्या लोकांबद्दलची आणि त्यांच्या दिवसभराच्या फोनच्या अचूक स्थानाबद्दल अचूक माहिती असल्याचा तपशील आहे."
या नव्या आरोपांवर आणि सीबीआय तपासाच्या मागणीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, महुआ मोइत्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लेट्स डू वर नाराजी व्यक्त केली. मात्र, काही तासांनंतर महुआनेही ही पोस्ट डिलीट देखील केली आहे. त्यामुळे मोईत्रा या आता नव्या वादात सापडल्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा