Literature summit
मराठी साहित्य संमेलन File Photo
महाराष्ट्र

Literature summit| आगामी साहित्य संमेलन मुंबईत ?

पुढारी वृत्तसेवा

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार? साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असणार? याबाबत साहित्यवर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आगामी साहित्य संमेलन देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये, राज्याची राजधानी मुंबईत की इचलकरंजी येथे, ही साहित्यप्रेमींची उत्कंठा लवकरच दूर होणार आहे.

४ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत मुंबईच्या नावाची निश्चिती होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत झालेल्या संमेलनांमध्ये आयोजकांची कुमकुवत असलेली आर्थिक स्थिती, कार्यकर्त्यांची अपुरी संख्या आणि साहित्यप्रेमींच्या मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे संमेलने फसल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे.

त्यामुळे यंदा संमेलन काही करून यशस्वी करायचे, या निर्धाराने महानगरात किंवा महानगराच्या जवळपास संमेलन घेतले जाण्याचे संकेत आहेत. साहित्य संमेलनाच्या आयोजनापासून ते अध्यक्षपदापर्यंतची चर्चा सुरू झाली आहे. अमळनेर येथे झालेल्या संमेलनानंतर आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला आगामी ९८ व्या साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत. त्यासाठी दिल्लीतून आलेली दोन संस्थांची निमंत्रणे, इचलकरंजी, औंध (जि. सातारा), औदुंबर, मुंबई आणि धुळे येथूनही निमंत्रणे आली.

मुंबईत झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत इचलकरंजी, मुंबई आणि दिल्ली या तीन ठिकाणी भेट देण्याचे ठरविण्यात आले. महामंडळाच्या स्थळ निवड समितीकडून निमंत्रणस्थळांची प्रत्यक्ष पाहणी होईल आणि ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समितीच्या अहवालावर चर्चा होऊन साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित होणार आहे. संमेलन मुंबईत होण्याची शक्यता असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात आहे.

महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समितीच्या अहवालावर चर्चा होऊन साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित केले जाणार आहे. मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या ठिकाणांची पाहणी करून स्थळ निश्चित करण्यात येणार असल्याचे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

SCROLL FOR NEXT