अयोध्येहून परतताना भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

तासगावमधील दोघांचा समावेश; मध्य प्रदेशात कंटेनरला कार धडकली
Accident News
मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात महिलेसह चौघांचा मृत्यू झाला. File Photo

सांगली/बांबवडे/मलकापूर : मध्य प्रदेशातील सारंगपूर-पाचोर महामार्गावर उभा असलेल्या कंटेनरवर कार आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात महिलेसह चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दिलदार तांबोळी (वय 65, रा. बांबवडे, ता. शाहूवाडी) यांच्यासह सांगलीतील सुनीता अर्जुन कदम (49, रा. विजयनगर) व तासगाव येथील हमजेखान अमीन अत्तार (58, मूळ गाव बोरगाव, सध्या रा. ढवळी वेस, तासगाव) व सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. अनिल पाटील (31, रा. पिशवी, ता. शाहूवाडी) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अयोध्येहून देवदर्शन घेऊन इंदूरकडे कारमधून जाताना सोमवारी (दि. 8) सकाळी नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

Accident News
नागपूर : रिल्स बनविण्याच्या नादात उलटली कार; दोन युवक ठार, तीन गंभीर

बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील दिलावर फोटो शॉपचे मालक दिलदार तांबोळी हे त्यांचा मित्र अनिल पाटील तसेच त्यांचे जवळचे नातेवाईक हमजेखान अत्तार, सुनीता अर्जुन कदम व भगवान पवार (32, रा. सोलापूर) यांच्यासोबत एका कंपनीच्या बैठकीसाठी लखनौ येथे गेले होते. तेथून ते दर्शनासाठी अयोध्या येथे गेले. अयोध्या दर्शन करून माघारी परतत असताना वाटेत सारंगपूर-पाचोर महामार्गावर उभा असणार्‍या कंटेनरवर त्यांची कार भरधाव वेगात धडकली. यात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन हमजेखान अत्तार, सुनीता कदम व भगवान पवार या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दिलदार तांबोळी यांचा शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान सोमवारी रात्री मृत्यू झाला. गंभीर जखमी अनिल पाटील याच्यावर पाचोरा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अनिल याचा बांबवडे येथे चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. श्वासोच्छ्वासात अडथळा होत असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अपघाताची भीषणता इतकी होती की, धडकेत कारचा पुढील अर्धा भाग तुटून जाऊन मागील काचेचा स्फोट झाला. यावेळी अपघातग्रस्त कारमध्ये अडकून पडलेल्यांना स्थानिक पोलिसांनी कटरच्या साहाय्याने कारचा पत्रा तोडून बाहेर काढले. अपघाताचे वृत्त समजतात येथील बांबवडे आणि पिशवी येथील तांबोळी व पाटील यांचे कुटुंबीय विमानाने इंदूरला रवाना झाले.

दरम्यान, दिलदार तांबोळी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचे धाकटे बंधू दिलावर हे रुग्णावाहिकेने कोल्हापूरच्या दिशेने निघाले असून, बुधवारी (दि. 10) सकाळी बांबवडे येथे ते दाखल होण्याचा अंदाज आहे. मृत दिलदार हे कोल्हापूर येथील प्रसिद्ध कांकायन आयुर्वेदिक पंचकर्म केंद्राचे संचालक डॉ. दिलखूश तांबोळी यांचे बंधू होत. या दुर्दैवी घटनेने बांबवडेत शोककळा पसरली आहे.

सांगली, तासगावात शोककळा

मध्य प्रदेशामधील पाचोरजवळील अपघातात सांगलीतील व तासगावमधील दोघांचा मृत्यू झाल्याचे कळताच शोककळा पसरली. सांगलीतील सुनीता अर्जुन कदम व तासगाव येथील हमजेखान अमीन अत्तार अशी मृतांची नावे आहेत.

हमजेखान अत्तार यांच्यासोबत त्यांचे मेहुणे दिलदार मकबूल तांबोळी (रा. मलकापूर, बांबवडे), चालक पवार व सांगलीतील सुनीता कदम यांच्यासह आणखी एकजण कारमध्ये होते. ते सर्वजण एका खासगी कंपनीसाठी काम करतात. कंपनीच्या कार्यक्रमासाठी ते लखनौला गेले होते. तेथूून परतत असताना पाचोरजवळ कारने थांबलेल्या कंटनेरला धडक दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्यासोबत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी 21 जणही लखनौला गेले होते. त्यांनीच अपघाताची माहिती नातेवाईकांना दिली. हमजेखान अत्तार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ आहेत. सुनीता कदम यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त समजताच अत्तार व कदम कुटुंबातील नातेवाईक मध्य प्रदेशकडे रवाना झाले. मध्य प्रदेश पोलिसांनी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून, बुधवारी सकाळी आठपर्यंत मृतदेह सांगलीत आणण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news