अकोला; पुढारी वृत्तसेवा : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कट्यार फाटा नजीक आज (शनिवार) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कार व पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. दोनजण गंभीर तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे.
बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग- अकोला महामार्ग क्रमांक 200 वरील कट्यार फाटा नजीक वळण मार्गावर कार, पिकअपचा भीषण अपघात झाला. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आपातापा कडून दहिहांडाकडे गॅस सिलेंडर घेऊन जात असलेली महिंद्रा पिकअप एम.एच.30 बि.डी. 0845 व म्हैसांग वरुन अकोलाकडे येत असलेल्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच. 38, 5727 या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
या भीषण अपघातामध्ये महिंद्रा पिकअप चालक व कार चालक दोघेही जागीच ठार झाले. कारमधील एक पुरुष व एक महिला गंभीर जखमी झाली. पिकअपमधील एकजण किरकोळ जखमी झाला. या भीषण अपघातातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णवाहिका पोहोचण्याआधीच महिंद्रा पिकअप चालकाचा मृत्यू झाला. अन्य गंभीर जखमींना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले.