Dog bite :  Pudhari Photo
यवतमाळ

Umarkhed Stray Dog Attacks | उमरखेडमध्ये मोकाट श्वानांचा उच्छाद; आठवडाभरात २५ जणांना चावा

पाटील नगरात पिसाळलेल्या श्वानाचा सहा जणांवर हल्ला; नागरिकांनीच घेतला बंदोबस्त, नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप

पुढारी वृत्तसेवा

Umarkhed Stray Dog Attacks

उमरखेड : उमरखेड शहरात मोकाट आणि पिसाळलेल्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवडाभरात मोकाट श्वानांनी तब्बल २५ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडतानाही सावधगिरी बाळगावी लागत आहे. मात्र, वारंवार घडणाऱ्या या घटनांनंतरही नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या आठवड्यात एकाच दिवशी मोकाट श्वानांनी १५ नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले होते. या घटनेनंतर शहरातील श्वानांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने प्रभावी पावले उचलली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी, ९ आणि १० नोव्हेंबर रोजी पाटील नगर परिसरात एका पिसाळलेल्या श्वानाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या श्वानाने परिसरातील पाच ते सहा नागरिकांवर हल्ला करून त्यांना चावा घेतला. या प्रकाराची माहिती नागरिकांनी तातडीने नगरपरिषद प्रशासनाला दिली. मात्र, पिसाळलेल्या श्वानाला पकडण्यासाठी पालिकेचे कर्मचारी किंवा संबंधित पथक घटनास्थळी दाखल झाले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसताना दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच श्वानाने पुन्हा नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. अखेर प्रशासनाची वाट पाहण्याऐवजी पाटील नगरातील नागरिकांनीच एकत्र येत पिसाळलेल्या श्वानाचा पाठलाग केला आणि त्याचा बंदोबस्त केला.

यानंतर नगरपरिषद प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यावेळी पालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मृत श्वानाला उचलून नेले. जिवंत पिसाळलेला श्वान नागरिकांवर हल्ले करीत असताना प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही; मात्र श्वान मृत झाल्यानंतर कर्मचारी तत्काळ पोहोचले, अशी टीका नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकारामुळे पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

श्वानमालकांच्या निष्काळजीपणाचाही प्रश्न

शहरातील मोकाट श्वानांच्या समस्येमागे काही श्वानमालकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक जण हौसेखातर श्वान पाळतात आणि त्यांना खाद्यही देतात. मात्र, त्यांना सुरक्षित ठिकाणी न ठेवता रस्त्यावर मोकाट सोडून दिले जाते. अनेक श्वानांचे लसीकरण झालेले नसल्याने नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी

मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. श्वानांचे लसीकरण आणि निर्बीजीकरण करण्याची मोहीम नियमितपणे राबवावी. तसेच पाळीव श्वानांना मोकाट सोडणाऱ्या मालकांना नोटिसा बजावून नियमांनुसार दंडात्मक कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.

शहरात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर श्वानांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असताना नगरपरिषद प्रशासन आणखी किती काळ दुर्लक्ष करणार? एखाद्याच्या जीवावर बेतल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल उमरखेडमधील नागरिक उपस्थित करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT