यवतमाळ : भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास उमरखेड तालुक्यातील नागपूर-तुळजापूर महामार्गावरील चिल्ली गावाजवळ घडली. अकिला अमीर बेग मिर्झा (वय ५० रा. सुकळी ज. ता. उमरखेड) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती अमीरबेग मिर्झा (वय ५८) असे अपघातातील जखमी पतीचे नाव आहे.
शुक्रवारी सकाळी पती-पत्नी (एमएच २६ एपी ०९०१) क्रमांकाच्या दुचाकीने नांदगव्हाणकडे जात होते. याच दरम्यान समोरुन (एमएच ३१ डिसी ५०३२) या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील अकिला या दुभाजकावर फेकल्या गेल्याने डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती अमीरबेग मिर्झा हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर जखमी पतीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून अकिला यांचा मृतदेहही उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ, पीएसआय मुंडे करीत आहेत. याप्रकरणी मृताचा मुलगा इब्राहिम बेग याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.