यवतमाळ : पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून चिमुकल्या सख्ख्या बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि.१) सकाळी दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील साईनगरी ले-आऊटमध्ये उघडकीस आली. या घटनमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रियंका गणेश राठोड (वय १०) व कार्तिक गणेश राठोड (वय ८) अशी मृत बहीण-भावांची नावे आहेत. दारव्हा ते आर्णी मार्गाला लागून असलेल्या या ले-आऊटमध्ये दहा फूट खोल खड्डे खोदण्यात आले होते. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने तेथे हे दोघेही पोहण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोहण्याचा प्रयत्न करताना दोघेही पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. मंगळवार (दि.३०) रात्री उशिरापर्यंत मुले घरी परतली नसल्याने पालकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, ती सापडली नाहीत. अखेर बुधवारी (दि. १) सकाळी ११ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अशा धोकादायक खड्ड्यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.