

जळगाव : डंपरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू झाला असून एक मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२६) दुपारी १२.३० च्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणार फाटा येथे घडली. नितेश जगतसिंग चव्हाण (वय ३२) त्यांची पत्नी सुनीता नितेशसिंग चव्हाण, मुलगा शिव नितेश चव्हाण (वय ७) अशी मृतांची नावे असून निहाल नितेशसिंग चव्हाण (वय ८) हा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरची तोडफोड केली.
याबाबत अधिक माहिती अशी, नितेश जगतसिंग चव्हाण हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह (दुचाकी क्र, एम एच ४८ एल २६९५) दुचाकीवरून निघाले होते. ते पुरनाड फाट्याजवळ आले असता मुरूम भरलेल्या (एमएच १९ सीएक्स २०३८) या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला उडविले. यामध्ये डंपरखाली सापडून जगतसिंग चव्हाण, पत्नी सुनिता व मुलगा शिव यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मुलगा निहाल हा गंभीर जखमी असल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातनंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत डंपरची तोडफोड करून डंपरची तोडफोड केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्थानकात डंपरचालकावर गुन्हा दाखल झाला असून चालकाचा शोध सुरू आहे.