Dushyant Chaturvedi  Pudhari
यवतमाळ

Yavatmal Mlc Election | भुतडांसह सर्व अपक्षांची माघार; दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड निश्चित

यवतमाळ विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांच्यासह अपक्ष उमेदवार सय्यद फारूख आणि साजिद बेग यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले

पुढारी वृत्तसेवा

Dushyant Chaturvedi Elected Unopposed

उमरखेड : यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत गुरुवारी (दि.४) महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. भाजपचे बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांच्यासह अपक्ष उमेदवार सय्यद फारूख आणि साजिद बेग यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. आता त्यांच्या निवडीची केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.

यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी बुधवारी अनपेक्षितपणे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले होते. मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार नितीन भुतडा शेवटपर्यंत मैदानात राहणार की माघार घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

उमेदवारी अर्ज दाखल करतानाच पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचे पालन करू, अशी भूमिका भुतडा यांनी जाहीर केली होती. त्यानुसार अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्याचबरोबर सय्यद फारूख आणि साजिद बेग यांनीही माघार घेतल्याने दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला.

दरम्यान, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असूनही साहेबराव कांबळे यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी कोणतीही चर्चा न करता उमेदवारी मागे घेतल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी कांबळे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईची मागणी केल्याची चर्चा सुरू आहे. तसेच कांबळे लवकरच शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही वेग आला आहे.

नितीन भुतडा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आपण भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देत उमेदवारी मागे घेतल्याचे नमूद केले आहे. या घडामोडींमुळे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पुन्हा एकदा जिल्ह्याबाहेरील उमेदवार विधान परिषदेत निवडून जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT