Umarkhed Farm Shed Fire Pudhari
यवतमाळ

Umarkhed Fire | शेतातील शेडला भीषण आग; २५ क्विंटल कापूस, शेळ्यांसह शेती साहित्य जळून खाक

उमरखेड तालुक्यातील चिल्ली (ज.) येथे तीन शेळ्या व दोन पिल्लांचा होरपळून मृत्यू; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Umarkhed Farm Shed Fire

उमरखेड : उमरखेड तालुक्यातील चिल्ली (ज.) येथे शेतातील शेडला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत तीन शेळ्या आणि दोन शेळीची पिल्ले दगावली, तर सुमारे २५ क्विंटल कापूस, शेती उपयोगी अवजारे आणि युरिया व डीएपी खताची दहा पोती जळून खाक झाली. या दुर्घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.

मौजे चिल्ली (ज.) येथील सर्वे क्रमांक १३९ मध्ये शेतकरी राहुल जयसिंग पवार व इतरांच्या शेतातील शेडला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेडमध्ये साठवून ठेवलेला कापूस, शेती साहित्य, खताची पोती आणि पशुधन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत तीन शेळ्या व दोन पिल्लांचा मृत्यू झाला. तसेच सुमारे २५ क्विंटल कापूस जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

आधीच शेतीतील उत्पादनातील घट आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी संकटात असताना या दुर्घटनेने संबंधित कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. वर्षभर मेहनत करून पिकविलेला कापूस, शेती उपयोगी साहित्य आणि पशुधन गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे राहुल वानखेडे यांनी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा चिल्लीचे सरपंच बळीराम राठोड यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली. यावेळी तलाठी, कृषी विभाग, महावितरण आणि पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राहुल वानखेडे यांनी दिली.

यावेळी लक्ष्मण कदम, श्रीराम कदम, मधुकर कदम, गजानन वानखेडे, मनान भाई, रुपेश वानखेडे, संतोष पवार, अशोक पवार, चरण पवार, लवकुश राठोड, अंकुश राठोड, लताबाई पवार, सुशीला राठोड, सुलोचना पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT