Yavatmal news
यवतमाळ: थंडीपासून बचावासाठी पेटवलेल्या शेकोटीमुळे घराला भीषण आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. या दुर्दैवी घटनेत एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना यवतमाळमधील पिंपळगाव परिसरातील लाल बहादूर शास्त्री शाळेसमोर घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मनीष सदाशिव नागेश्वर (वय ३८) असे मृत तरुणाचे नाव आहे. मनीष हा अविवाहित असून पिंपळगाव परिसरात आपल्या आईसोबत राहत होता. तो पेंटिंगची कामे करून आपला उदरनिर्वाह करत असे. त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याचे आईशी वारंवार भांडण होत असे. घटनेच्या दिवशी दारूच्या नशेत त्याने आईला घराबाहेर काढले आणि थंडी वाजत असल्याने घरातच शेकोटी पेटवून तो गाढ झोपी गेला.
काही वेळातच शेकोटीने रौद्ररूप धारण केले आणि घरातील साहित्याने पेट घेतला. बघता बघता आगीने संपूर्ण घराला कवेत घेतले. मनीष मद्याच्या नशेत आणि गाढ झोपेत असल्याने त्याला आगीची चाहूलही लागली नाही. घराला आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, या भीषण दुर्घटनेत मनीषचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले.