

Mangesh Kalokhe Murder Khopoli News: खोपोलीत शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश काळोखे यांचा भर दिवसा रस्त्यात धारदार शस्त्रांनी सपासप वार करून खून करण्यात आला होता. या हत्येनंतर संपूर्ण खोपोली हादरली होती. राजयकीय वर्तुळात देखील मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात मंगेश यांच्यावर वार करण्यात आघाडीवर असणाऱ्या आरोपीचे कनेक्शन हे बीडमधील वादग्रस्त व्यक्तीमत्व अन् सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडशी असल्याचे आरोप होत आहेत.
खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आता बीड कनेक्शन उघड होऊ लागलं आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा बॉडीगार्ड महेश धायतडक हा बीड जिल्ह्यातील असून सीसीटीव्ही फुटेजमधून याच महेशनं मंगेश यांच्यावर सर्वाधिक वार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांनी आरोपी महेश हा वाल्मीक कराडचा निकटवर्तीय असल्याचा दावा केला आहे. आरोपीच्या सोशल मीडिया पेजवर आरोपी महेशचे वाल्मीक कराडसोबत फोटो आढळल्याचं थोरवे यांनी सांगितलं आहे. ही माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
इतकेच नव्हे तर आरोपीच्या मोबाईलमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतचेही फोटो असल्याचे सांगत थोरवे यांनी तपासाची मागणी केली आहे. बीडमधील गुन्हेगारी टोळ्यांचे धागेदोरे खोपोलीपर्यंत पोहोचल्याने पोलीस प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे.
रायगड पोलीस अधीक्षक दलाल मॅडम या प्रकरणाचा तपास करत असून सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. "ज्या अमानवी पद्धतीने मंगेशची हत्या केली, त्याबद्दल आरोपी धायतडकला फाशीच झाली पाहिजे," अशी मागणी थोरवे यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे वाल्मीक कराडची गँग अजूनही सक्रिय असल्याच्या आरोपांना बळ मिळाले असून पोलीस 'बीड कनेक्शन'चा सखोल तपास करत आहेत.