यवतमाळ : दारव्हा येथे रेल्वे पुलाच्या खड्यात बुडून चार चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला होता. बुधवारी घडलेल्या या घटनेत रिहान खान (वय १३) याचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आक्रोश करीत नातेवाइकांसह आजोबा दारव्हा येथे पोहोचले. नातवाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आजोबांनीही बुधवारी (दि.२०) रात्री प्राण सोडला. एकाच कुटुंबातील दोघांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे दिग्रससह दारव्हा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुनीर खान शमशेर खान ऊर्फ मुन्नाभाई पेपरवाले (वय ६८, रा. दिग्रस) असे मृत आजोबांचे नाव आहे. दारव्हा येथील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या उड्डाणपुलासाठी खड्डा खोदण्यात आला होता . पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले होते. बुधवारी (दि.२०) चार शाळकरी मुलांचा त्यात बुडून मृत्यू झाला. यात रिहान असलम खान याचा देखील समावेश होता. या घटनेची माहिती मिळताच दिग्रस येथील वृत्तपत्र वितरक आजोबा मुनीर खान शमशेर खान ऊर्फ मुन्नाभाई पेपरवाले व नातेवाईक सायंकाळी दारव्हा येथे पोहोचले. मुनीर खान यांना एकुलत्या एक नातवाच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसला. नातेवाच्या मृत्यूमुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. दारव्हा येथे मुलीच्या घरी नातवाच्या वियोगात नैराश्येत गेलेल्या मुनीर यांचा बुधवारी (दि.२०) रात्री ह्रदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला.