

Tarapur pharmaceutical factory gas leak
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्र पुन्हा एकदा भीषण दुर्घटनेने हादरले आहे. प्लॉट क्रमांक एफ-१३ वरील मेडली फार्मासिटिकल्स या औषधनिर्मिती कारखान्यात गुरुवारी दुपारी अचानक वायूगळती होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला असून, दोन जण अत्यवस्थ अवस्थेत उपचार घेत आहेत. मृत आणि जखमी सर्व कामगार हे कारखान्यातील नियमित कामगार असून, त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास कारखान्यात अल्बेंडोझोल या उत्पादनाची प्रक्रिया सुरू असताना अचानक विषारी वायूगळती झाली. या वायूच्या संपर्कात आल्याने सहा कामगार गंभीर जखमी झाले. तात्काळ सर्वांना बोईसर येथील खाजगी शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान कमलेश यादव, कल्पेश राऊत, धीरज प्रजापती आणि बंगाली ठाकूर या चौघांचा मृत्यू झाला. तर रोहन शिंदे आणि निलेश हाडळ या दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्येही तीव्र संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रदूषण नियंत्रण मंडळाचाही पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्र हे देशातील सर्वाधिक प्रदूषणकारी औद्योगिक क्षेत्र म्हणून कुप्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांत येथे वारंवार अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असून, अनेक निर्दोष कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता, निष्काळजीपणाने उत्पादन सुरू ठेवल्याचा आरोप स्थानिक कामगार संघटनांनी केला आहे.
या दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेच्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशा जोरदार मागण्या परिसरातून होत आहेत.