Gram panchayat Records Birth Death Registration (Pudhari Photo)
यवतमाळ

Yavatmal News | संशयास्पद : यवतमाळ जिल्ह्यात दीड हजार लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्म-मृत्यू नोंदी

शेंदुरसनी ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर संशयास्पद नोंदी आढळल्याने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Gram panchayat Records Birth Death Registration

यवतमाळ : आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी ग्रामपंचायतीच्या जन्म-मृत्यू नोंदणी (सी.आर.एस.) प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर संशयास्पद नोंदी आढळून आल्या आहेत. दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजीच्या अवैध व विलंबित जन्म-मृत्यू नोंदी रद्द करण्याबाबतच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरू असताना ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

आर्णी येथील विस्तार अधिकारी (आरोग्य) यांनी तपासणीदरम्यान शेंदुरसनी ग्रामपंचायतीच्या सी.आर.एस. सॉफ्टवेअरवर २७, ३९८ जन्म नोंदी व ११ मृत्यू नोंदी आढळून आल्या. प्रत्यक्षात सदर ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे दीड हजार इतकी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोंदी आढळणे गंभीर बाब ठरली.

ही बाब जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू) यांनी तत्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवगत केली. घटनेची गंभीरता लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून शेंदुरसनी ग्रामपंचायतीस भेट देऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीअंती २७ हजार ३९७ जन्म नोंदी व ७ मृत्यू नोंदी या ग्रामपंचायत क्षेत्रातील नसून संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले आहे. एवढ्या प्रमाणात नोंदी ग्रामपंचायतीमार्फत होणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले.

तांत्रिक तपासणीसाठी सदर प्रकरण उपसंचालक आरोग्य सेवा (आमाजिआ), पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले. राज्यस्तरीय लॉगिनवरून तपासणीअंती शेंदुरसनी ग्रामपंचायतीचा सी.आर.एस. आयडी मुंबई येथे मॅप असल्याचे निदर्शनास आले. पुढील तपासणीसाठी हे प्रकरण भारताचे अतिरिक्त रजिस्ट्रार जनरल कार्यालय व राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी), दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आले.

दि.११ डिसेंबर २०२५ रोजी प्राप्त झालेल्या तांत्रिक तपासणी अहवालानुसार सदर नोंदी सायबर फ्रॉडच्या शक्यतेअंतर्गत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवार दि. १६ डिसेंबरला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ओटीपी कोणालाही देऊ नयेत

जिल्ह्यातील सर्व निबंधक जन्म-मृत्यू यांना आपले सी.आर.एस. आयडी, पासवर्ड व ओटीपी कोणालाही देऊ नयेत. तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित जिल्हा स्तरावर कळवावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू), यवतमाळ यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT