Bahurupi Traditional Performing Arts Pudhari
यवतमाळ

Bahurupi Folk Art | खाकी वर्दीचा रुबाब, पण पोलीस नाहीत! २० वर्षांपासून गावोगावी फिरतोय हा ‘बहुरूपी’

कधी इन्स्पेक्टर, तर कधी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा; अभिनयातून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत जगतोय पारंपरिक कलेचा वारसा

पुढारी वृत्तसेवा

Traditional Performing Arts

प्रशांत भागवत

उमरखेड : खाकी वर्दी अंगावर, डोक्यावर पोलीस अधिकाऱ्याची टोपी, डोळ्यांवर गॉगल आणि चेहऱ्यावर करारी भाव... एखाद्या दुकानात या ‘इन्स्पेक्टर’ने प्रवेश केला की उपस्थितांचे लक्ष आपसूक त्याच्याकडे जाते. क्षणभर खरोखरच पोलीस अधिकारी तपासणीसाठी आल्याचा भास निर्माण होतो. मात्र, काही क्षणांतच त्याच्या मिश्कील संवादांना सुरुवात होते आणि गंभीर झालेल्या वातावरणात हास्याची कारंजी फुलतात. ‘तपासणी करायला आलोय; पण गुन्हे शोधायला नाही, तुमचं हसू शोधायला आलोय!’ अशा भन्नाट संवादातून हा इन्स्पेक्टर आपली खरी ओळख उघड करतो. तो पोलीस अधिकारी नसून पिढीजात बहुरूपी कलाकार आहे.

सुनील अशोक शिंदे, (रा. येहळेगाव (तुकाराम), ता. कळमनुरी, जि. हिंगोली), असे या अवलिया कलाकाराचे नाव. त्यांचे वडील अशोक शिंदे हेदेखील बहुरूपी कलाकार होते. वडिलांकडून मिळालेला कलेचा वारसा सुनील यांनी पुढे चालवला. गेल्या सुमारे वीस वर्षांपासून ते महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये फिरून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारत लोकांचे मनोरंजन करत आहेत.

वेशांतरासोबत अभिनयाचीही कमाल

बहुरूपी कला म्हणजे केवळ वेगवेगळे पोशाख परिधान करणे नव्हे. आवाजातील चढ-उतार, देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव आणि प्रसंगानुरूप संवादफेक यांचा सुरेख मेळ साधावा लागतो. सुनील शिंदे यांचे वैशिष्ट्य म्हणजे काही क्षणांत समोरच्या व्यक्तीला आपण खऱ्याखुऱ्या पोलीस अधिकाऱ्यासमोर उभे असल्याचा भास करून देणे. त्यानंतर मिश्कील संवादांची अशी फटकारणी होते की उपस्थितांना हसू आवरता येत नाही.

दिवाळीचा उत्साह ओसरल्यानंतर सुनील यांची पुन्हा गावोगावी भटकंती सुरू झाली आहे. उमरखेडमधील एका व्यापारी संकुलात त्यांची भेट झाली. खाकी वर्दीतील त्यांचा रुबाब पाहून अनेक जण थबकले. मात्र, संवाद सुरू झाल्यानंतर त्यांच्या अभिनयातील विनोदबुद्धी आणि कलाकारीची प्रचिती आली. काही वेळ लोकांचे मनोरंजन करायचे, त्यानंतर मिळालेली बिदागी स्वीकारायची आणि पुढच्या ठिकाणाकडे रवाना व्हायचे, असे त्यांचे रोजचे जीवन आहे.

वडिलांचा वारसा जपला; मुलांनी मात्र वेगळी वाट निवडावी!

‘आमच्या वडिलांनी हाच व्यवसाय केला. आम्हीही त्यांचा वारसा पुढे चालवत आहोत. लोकांनी दोन क्षण हसावे, आनंद घ्यावा आणि त्यातून आम्हाला बिदागी मिळावी, एवढीच अपेक्षा आहे,’ असे सुनील शिंदे सांगतात.

मात्र, आपल्या तीन मुलांनी हा व्यवसाय करू नये, अशी त्यांची इच्छा आहे. तिन्ही मुले महाविद्यालयीन शिक्षण घेत असून त्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे वेगळे भविष्य घडवावे, असे त्यांना वाटते. ‘आम्ही परिस्थितीमुळे हा व्यवसाय स्वीकारला; पण मुलांनी शिकून चांगले आयुष्य उभे करावे,’ अशी त्यांची भावना आहे.

कलेचा वारसा जपताना आर्थिक संघर्ष

पारंपरिक बहुरूपी कलेचा वारसा जपत असताना शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळाली नसल्याची खंत सुनील यांच्या मनात आहे. ग्रामीण भागातील आणि भटकंती करणाऱ्या कलाकारांना आर्थिक आधार मिळावा, त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि सादरीकरणासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.

आज मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल मनोरंजनाच्या युगात पारंपरिक बहुरूपी कला हळूहळू मागे पडत आहे. मात्र, सुनील शिंदे यांच्यासारखे कलाकार प्रतिकूल परिस्थितीतही ही कला जिवंत ठेवण्यासाठी गावोगावी भटकंती करत आहेत. स्वतःच्या आयुष्यात संघर्ष असतानाही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे आणि त्यातून मिळणाऱ्या बिदागीवर संसाराचा गाडा चालवायचा, अशी त्यांची जीवनकहाणी आहे.

खाकी वर्दीतील हा ‘इन्स्पेक्टर’ एका गावातून दुसऱ्या गावाकडे निघून जातो. मागे राहतात ते त्याच्या अभिनयाने खुललेले हास्याचे क्षण आणि एका पारंपरिक कलावंताच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT