Painganga sanctuary tiger mating 
यवतमाळ

Painganga sanctuary tiger mating: पैनगंगा अभयारण्यात 'गुप्त' मोहिमेला यश: पेंचमधून आणलेल्या वाघ-वाघिणीचे मिलन

एकंबाच्या घनदाट जंगलात पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या नव्या वाघ आणि वाघिणीची जोडी जमली आहे

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत भागवत

उमरखेड : पैनगंगा अभयारण्यातून वन्यजीव प्रेमी आणि वन विभागासाठी एक अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. अभयारण्यातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी वन्यजीव विभागाने राबवलेल्या एका गोपनीय मोहिमेला यश आले असून, एकंबाच्या घनदाट जंगलात पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या नव्या वाघ आणि वाघिणीची जोडी जमली आहे.

रणनीतीतील बदल आणि गुप्त मोहीम

काही काळापूर्वी पैनगंगा अभयारण्यात वंशवृद्धी व्हावी या उद्देशाने पेंच अभयारण्यातून एका वाघिणीला आणण्यात आले होते. या अभयारण्यात आधीपासूनच असलेल्या 'जॉनी' नावाच्या बलाढ्य वाघाशी तिचे मिलन घडवून आणण्याचा वन विभागाचा प्रयत्न होता. परंतु, 'जॉनी' अचानक गायब झाल्यामुळे वन विभागाची ही योजना काही काळ अडगळीत पडली. मात्र, न खचता वन्यजीव विभागाने गुप्तपणे नवी मोहीम आखत पेंच अभयारण्यातून तातडीने एका नव्या नर वाघाला पैनगंगामध्ये आणले. या संपूर्ण स्थलांतर (ट्रान्सलोकेशन) प्रक्रियेबाबत विभागाने कमालीची गोपनीयता बाळगली होती.

एकंबाच्या जंगलातील दृश्य

नवीन नर वाघ आणि वाघिणीला एकंबाच्या जंगलात सोडल्यानंतर वन कर्मचाऱ्यांची त्यांच्यावर बारीक नजर होती. अलिकडेच या जोडीचा एक सुंदर व्हिडिओ ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात हे दोन्ही वाघ एकमेकांशी खेळताना आणि प्रेमाची देवाणघेवाण करताना दिसत आहेत. जंगलाच्या शांततेत घुमणाऱ्या त्यांच्या डरकाळ्यांमुळे वन विभागाच्या आशा उंचावल्या आहेत.

अभयारण्यात नव्या पिढीची आस

या दोघांच्या यशस्वी मिलनामुळे लवकरच पैनगंगा अभयारण्यात छाव्यांचे आगमन होईल आणि अभयारण्याला नवीन संजीवनी मिळेल, असा विश्वास वन्यजीव प्रेमी आणि अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. अत्यंत गोपनीय ठेवलेली ही मोहीम आता यशाच्या उंबरठ्यावर उभी असून, एकंबाचे जंगल या नव्या जोडीच्या सहवासाचे साक्षीदार ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT