Kisanrao Wankhede
उमरखेड : पूर्वाश्रमीचे अभियंता असलेले आमदार किसनराव वानखेडे यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग क्रमांक २ कार्यालयाला अचानक भेट देत अभियंत्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. गुरुवारी (दि. २९) सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनी कार्यालयाची पाहणी केली. यावेळी तालुक्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची माहिती घेताना अभियंत्यांना इस्टीमेट आणि कामातील तांत्रिक बाबींची समाधानकारक माहिती देता आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदारांनी ‘कामात प्रामाणिकपणा नसेल, तर नोकऱ्या सोडा,’ अशा शब्दांत अधिकाऱ्यांना खडसावले.
शासकीय कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आमदार वानखेडे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध शासकीय कार्यालयांना अचानक भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेअंतर्गत त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग क्रमांक २ कार्यालयाला भेट दिली. यावेळी उपविभागीय अभियंता बैठकीसाठी यवतमाळ येथे गेल्याचे समजले. त्यामुळे उपस्थित तीन शाखा अभियंत्यांकडून त्यांनी तालुक्यात सुरू असलेल्या बांधकामांची माहिती घेतली.
मात्र, सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामांचे इस्टीमेट, त्यातील तांत्रिक बाबी आणि कामाची पद्धत याबाबत अभियंत्यांना स्पष्ट माहिती देता आली नाही. रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या काँक्रिटचे प्रमाण, मिश्रणाचे गुणोत्तर तसेच इस्टीमेटनुसार काम सुरू आहे की नाही, याबाबत आमदारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. ‘एम-१० ची डायरी काढा, इस्टीमेट दाखवा,’ अशी मागणी करूनही संबंधित कामाच्या इस्टीमेटची प्रत उपलब्ध करून देता न आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अभियंत्यांनाच रस्त्यांच्या कामातील तांत्रिक बाबींची माहिती नसेल, तर दर्जेदार रस्ते कसे तयार होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केवळ बांधकामाच्या ठिकाणी भेट देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष काम इस्टीमेटनुसार सुरू आहे की नाही, याची खातरजमा करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापुढे प्रत्येक कामाच्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध ठेवावीत, काँक्रिटच्या क्युरिंगची तारीख आणि कालावधी नमूद करावा, तसेच संबंधित कामाच्या इस्टीमेटची प्रत कार्यालयात ठेवावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. सर्व विकासकामे इस्टीमेटनुसार आणि निर्धारित तांत्रिक निकषांचे पालन करूनच पूर्ण करावीत, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. आमदारांच्या या अचानक पाहणीमुळे बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे उपस्थिती मस्टर तपासताना काही कर्मचाऱ्यांनी पुढील दिवसाच्या तारखेच्या सह्याही आधीच केल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले. या प्रकाराबाबत संबंधित कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत नोंद घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
शासकीय कार्यालयातील उपस्थिती, कामकाजातील शिस्त आणि विकासकामांचा दर्जा याबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार किसनराव वानखेडे यांनी या पाहणीद्वारे दिला.