Yavatmal District Bank Election  Pudhari
यवतमाळ

Yavatmal DCC Bank Election | यवतमाळ जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा; अपक्ष उमेदवाराची बाजी; 'मविआ'ला ८ जागा

महायुती समर्थित बळीराजा सहकार पॅनलची तब्बल 16 जागांवर विजय मिळवत बँकेवर एक हाती सत्ता

पुढारी वृत्तसेवा

Yavatmal District Bank Election Results

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 25 संचालक पदाच्या निवडणुकीसाठी रविवार दि. 11 ऑक्टोंबर  रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडले. तर सोमवारी (दि.१२) मतमोजणी करण्यात आली. यामध्ये महायुती समर्थित बळीराजा सहकार पॅनलने तब्बल 16 जागांवर विजय मिळवून बँकेवर एक हाती सत्ता मिळविली आहे.  सत्ताधारी महाविकास आघाडी समर्थित शेतकरी सहकार विकास आघाडीला आठ जागांवरच समाधान मानावे लागले. या निवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराने ही विजय मिळवून बाजी मारली आहे. 

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज झालेल्या मतमोजणीमध्ये सर्वप्रथम तालुका गटातील उमेदवारांना मिळालेल्या मताची मोजणी करण्यात आली. यामध्ये यवतमाळ तालुका गटातून कौस्तुभ शिर्के, नेर मधून स्नेहल भाकरे, राळेगाव मधून प्रवीण कोकाटे, कळंब मधून प्रवीण देशमुख, दारव्हा मधून सुशील राठोड, पुसद मधून विजय जाधव, दिग्रस मधून खासदार संजय देशमुख, बाभुळगाव मधून अमन गावंडे, महागाव मधून नितीन भुतडा हे सर्व महायुतीचे विजयी उमेदवार आहेत.

तर तालुका गटातूनच महाविकास आघाडीचे उमरखेड मधून राम देवसरकर, आर्णीमधून तृप्ती मनीष पाटील, पांढरकवडा मधून जितेंद्रसिंग गोरमनगर कोंगारेकर, घाटंजी मधून अरविंद भुरे, झरी मधून राजीव एलटीवार, वणी मधून अपक्ष सुनील कातकडे हे विजयी झाले. मारेगाव मधून आघाडीच्या किरण संजय देरकर ह्या विजयी झाल्या आहेत.

जिल्हा गटातून चारही उमेदवार महायुतीचे विजयी झाले असून यामध्ये देविदास चौरे, नाना गाडबैले, विराज घुईखेडकर, राजुदास जाधव हे विजयी झाले आहेत.  विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून महायुतीचे महेश राठोड विजयी झाले.

अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून मिलिंद मानकर महायुती हे विजयी झाले. इतर मागास प्रवर्ग मधून राहुल माणिकराव ठाकरे महाविकास आघाडी हे विजयी झाले. महिला राखीव मतदार संघातून महायुतीच्या स्मिता कदम व महाविकास आघाडीच्या स्वाती येंडे विजयी झाल्या आहेत.

उमरखेडमध्ये ईश्वरचिट्टी

उमरखेड तालुका गटातून महायुतीचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर व महाविकास आघाडीचे रामदेव सरकार या दोन्ही उमेदवारांना 25 - 25 अशी समान मते पडली. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ईश्वरचिट्टी द्वारे विजयी उमेदवाराची निवड केली. यामध्ये ईश्वरचिठ्ठीत राम देवसरकर बाजीगर ठरले. हे वृत्त कळताच राम देवसरकर समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

दोन उमेदवार मतदानापूर्वीच अविरोध

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर महायुतीचे दोन उमेदवार मतदानापूर्वीच अविरोध झाले होते यामध्ये दिग्रस तालुका गटातून खासदार संजय देशमुख आणि पुसद तालुका गटातून विजय जाधव या दोन उमेदवारांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT