Yavatmal DCC bank Election : उमरखेडमध्ये ईश्वरचिठ्ठीने राम देवसरकरांचा विजय!

२५-२५ मतांच्या बरोबरीने रंगली लढत; महागावात नितीन भुतडांचा २३ मतांसह एकतर्फी विजय
Yavatmal DCC bank Election
यवतमाळ जिल्हा बँक निवडणूक डावीकडे राम देवसकर व नितिन भुतडा
Published on: 
Updated on: 

प्रशांत भागवत

उमरखेड : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमरखेड आणि महागाव तालुका गटांचे निकाल अखेर सोमवारी यवतमाळ येथील समर्थ प्राईडच्या सभागृहात जाहीर झाले. मात्र, उमरखेड तालुका गटाचा निकाल हा केवळ मतांच्या आकड्यांपुरता मर्यादित राहिला नाही. ५२ मतदार, दोन प्रमुख उमेदवारांना प्रत्येकी २५ मते आणि त्यानंतर ईश्वरचिठ्ठीने लागलेला निकाल, अशा नाट्यमय घडामोडींनी या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले. महायुतीप्रणीत बळीराजा सहकार पॅनलचे उमेदवार माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांना पराभवाचा धक्का देत महाविकास आघाडीप्रणीत शेतकरी सहकार विकास पॅनलचे राम देवसरकर यांनी ईश्वरचिठ्ठीद्वारे विजय मिळविला. दुसरीकडे, महागाव तालुका गटात नितीन भुतडा यांनी २३ मते मिळवत एकतर्फी विजय नोंदविला.

२५-२५ मतांनी निकाल अडकला!

उमरखेड तालुका गटात एकूण ५२ मतदार होते. या गटात प्रकाश पाटील देवसरकर आणि राम देवसरकर यांच्यात थेट लढत झाली. मतदानानंतर प्रकाश पाटील देवसरकर यांनी किमान ३० मते मिळवून आपण विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला होता. तर राम देवसरकर यांनी निकाल जाहीर झाल्यानंतरच आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले होते.

मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीचे चित्र अपेक्षेपेक्षा वेगळे निघाले. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी २५ मते मिळाली, तर डॉ. अंकुश देवसरकर यांच्या समर्थनार्थ पडलेले एक मत व एक मत अवैध ठरल्याची माहिती समोर आली. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेली मतांची आघाडी कोणालाही मिळाली नाही आणि संपूर्ण निवडणुकीचा निकाल ईश्वरचिठ्ठीवर येऊन ठेपला.

दुपारी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही निकालाबाबतची उत्सुकता कायम होती. त्यानंतर फेरमतमोजणी करण्यात आली. त्यातही दोन्ही उमेदवारांची मते समान असल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर नियमानुसार ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. या प्रक्रियेत राम देवसरकर यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. मतमोजणीतील या नाट्यमय घडामोडींमुळे उमरखेड गटातील निवडणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली.

राजकीय प्रतिष्ठेची लढत ठरली निर्णायक

उमरखेड तालुका गटातील ही निवडणूक केवळ जिल्हा बँकेतील प्रतिनिधित्वाची लढत नव्हती, तर स्थानिक राजकीय प्रतिष्ठेचीही कसोटी मानली जात होती. एका बाजूला महायुतीच्या बळीराजा सहकार पॅनलचे उमेदवार प्रकाश पाटील देवसरकर, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार विकास पॅनलचे राम देवसरकर मैदानात होते. दोन्ही बाजूंनी केलेली मोर्चेबांधणी, समर्थकांची जमवाजमव आणि मतदानापूर्वी व्यक्त करण्यात आलेले विजयाचे दावे यामुळे या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

मात्र, प्रत्यक्ष मतदानाने सर्वच राजकीय आडाख्यांना छेद दिला. विजयासाठी आवश्यक असलेली आघाडी कोणत्याही उमेदवाराला घेता आली नाही. अखेर मतांची बरोबरी आणि ईश्वरचिठ्ठी यामुळे राम देवसरकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. या निकालाने निवडणुकीतील राजकीय गणितांपेक्षा प्रत्यक्ष मतदारांचा कौल किती निर्णायक ठरू शकतो, हे अधोरेखित केले.

जुन्या राजकीय संघर्षाची चर्चाही रंगली

राम देवसरकर यांच्या विजयानंतर उमरखेडच्या राजकीय वर्तुळात जुन्या राजकीय संघर्षाच्या आठवणींनाही उजाळा मिळाला. एकेकाळी त्यांचे वडील ,स्व,अॅड. अनंतराव देवसरकर यांना प्रकाश पाटील देवसरकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर, या विजयाकडे त्या जुन्या राजकीय संघर्षाच्या संदर्भातही पाहिले जात आहे. त्यामुळे या निकालाला केवळ सहकारी संस्थेच्या निवडणुकीपुरते महत्त्व न राहता स्थानिक राजकारणातील प्रतिष्ठेच्या लढाईची किनार लाभल्याची चर्चा समर्थकांमध्ये होती. मात्र, विजयाबाबत प्रतिक्रिया विचारली असता राम देवसरकर यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अधिकृत भाष्य समोर आले नाही.

महागावात भुतडांचा निर्विवाद कौल

उमरखेड गटात मतांची बरोबरी आणि ईश्वरचिठ्ठीमुळे उत्कंठा शिगेला पोहोचली असताना महागाव तालुका गटात मात्र निकालाचे चित्र स्पष्ट होते. या गटातील एकूण २८ मतदारांपैकी नितीन भुतडा यांना २३ मते मिळाली, तर शिवाजी सोनेकर यांना पाच मतांवर समाधान मानावे लागले. भुतडा यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत महागाव गटावरील आपले वर्चस्व सिद्ध केले.

निवडणुकीपूर्वी नितीन भुतडा यांच्या बाजूने अनुकूल वातावरण असल्याची चर्चा होती. प्रत्यक्ष निकालानेही त्याला पुष्टी दिली. उमरखेडमधील अटीतटीची लढत आणि महागावमधील एकतर्फी विजय, अशी परस्परविरोधी चित्रे या दोन तालुका गटांत पाहायला मिळाली.

आगामी राजकारणाची नांदी?

उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय क्षेत्रात उमरखेड आणि महागाव हे दोन्ही तालुके महत्त्वाचे मानले जातात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत या दोन गटांत समोर आलेले निकाल स्थानिक राजकीय समीकरणांच्या दृष्टीने लक्षवेधी ठरले आहेत. उमरखेडमध्ये अत्यंत अटीतटीच्या लढतीत राम देवसरकर यांनी मिळविलेला विजय आणि महागावमध्ये नितीन भुतडा यांना मिळालेला स्पष्ट कौल यामुळे आगामी काळात स्थानिक राजकारणात कोणती नवी समीकरणे आकाराला येतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुका या ग्रामीण भागातील राजकीय संपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक नेतृत्वाची ताकद तपासणाऱ्या महत्त्वाच्या लढती मानल्या जातात. त्यामुळे या निकालांचे राजकीय परिणाम केवळ जिल्हा बँकेतील प्रतिनिधित्वापुरते मर्यादित राहतील की त्यातून आगामी स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळेल, हे पुढील घडामोडींवर अवलंबून असेल.

निकाल जाहीर होताना यवतमाळ येथे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांसह उमरखेड तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उमरखेड गटातील ईश्वरचिठ्ठीने लागलेला निकाल आणि महागावमधील भुतडा यांचा विजय यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील या दोन गटांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news