महागाव :हिवरा (संगम) येथील श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात करण कुमार पुंजाजी भागवत (वय 30, रा. बेलथर, ता. कळमनुरी) या आरोग्य सेवकाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सायंकाळी 4:30 वाजता घडली.
नांदेडहून नागपूरकडे जाणारा ट्रक (एमएच 09 इएल 4392) आणि समोरून येणारी दुचाकी (एमएच 38 वाय एच 3748) यांची जोरदार धडक झाली. मयत करण कुमार हे हिंगणघाट येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावून गावी परतत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. घटनेचा पंचनामा महागाव पोलिसांनी केला असून पुढील तपास ठाणेदार धनराज निळे करत आहेत.
हिवरा संगम येथील हा भाग अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे. येथे दिशादर्शक फलक, गतीमर्यादा सूचना आणि गतिरोधकांचा पूर्णपणे अभाव आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे अनेक निष्पाप बळी जात आहेत. जोपर्यंत येथे सुरक्षा उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.